माघी गणेश जयंती: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, बुद्धी-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढ, शुभच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:33 IST2025-01-31T13:17:44+5:302025-01-31T13:33:53+5:30
Maghi Shree Ganesh Jayanti 2025: माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म उत्साहात साजरा केला जातो. कोणत्या राशींवर बाप्पाची कशी कृपा असू शकेल? जाणून घ्या...

Maghi Shree Ganesh Jayanti 2025: गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
०१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीगणेश जयंती आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु, माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्रीगणेश जयंती, गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनाही ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते.
माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. माघातील गणेशजयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. आताच्या घडीला ४ ते ५ ग्रह एकाच रेषेत आहेत. तर ५५९ वर्षांनी ७ नवपंचम राजयोग जुळून आला आहे. या माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती कोणत्या राशींसाठी कशी असेल? कोणत्या राशींना अनुकूल सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या...
मेष: नशिबाचा कौल बाजूने राहील. अचानक एखादी मोठी संधी चालून येईल. अनेक आघाड्यांवर यश मिळेल. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. योजनांच्या बाबतीत लोक रस दाखवतील. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. आळस झटकून मोठ्या तडफेने कामाला लागाल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यकर्त्यांना योग्य मान मिळेल.
वृषभ: एखाद्या रेंगाळत पडलेल्या कामाचा ताण जाणवत राहील. लवकरच कामे होतील. हलके वाटेल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. लोकांशी सबुरीने वागण्याची गरज आहे. नोकरीत बदल होईल. कानावर चांगल्या बातम्या पडतील. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. जीवनसाथीच्या लहरीपणामुळे मनस्ताप होऊ शकतो. थोडा संयम ठेवा.
मिथुन: मनात आनंदी विचार राहतील. बोलण्यामुळे जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. सावधपणे वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. चंद्राच्या भाग्य स्थानातील भ्रमणामुळे अनेक अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात सतत कशात ना कशात व्यस्त राहाल.
कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. योजना गुप्त ठेवा. नोकरीत कामासाठी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वेळ द्यावा लागेल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागावे. ओळखीच्या लोकांची मदत घेण्यात भिडस्तपणा ठेवू नका. वाहन जपून चालवा.
सिंह: चांगली फळे मिळतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जवळचा प्रवास घडून येईल. भेटीगाठी फलद्रूप होतील. आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करता कामा नये. कामातील बदलांमुळे व्यस्त राहाल. जीवनसाथीशी गैरसमज होईल. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.
कन्या: यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहा. मोठ्या उत्साहाने योजना आखाल. जीवनसाथीची साथ राहील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी. जुने वाद उकरून काढून वेळ वाया घालवू नका. त्यातून फायदा काहीच होणार नाही. मुलांवर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. थोडे सावधपणे वागा.
तूळ: यश मिळेल. परिश्रमाला पर्याय नाही. केलेल्या धडपडीचा फायदा होईल. विरोधकांच्या कारवायांवर वरचढ ठराल. मोठी गुंतवणूक करताना मात्र खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वाद सामोपचाराने मिटवा.
वृश्चिक: एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे कराल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. वडीलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याकडे कानाडोळा करू नका. फार घाईघाईत कामे करू नका. व्यावसायिक करारमदार करताना खबरदारी घ्यावी. फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीच्या म्हणण्याला मान द्यावा. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल.
धनु: आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील. त्यात फायदा होईल. बराच वेळ द्यावा लागेल. हाती पैसा आल्यामुळे योजनांना चालना देता येईल. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.
मकर: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. अती आत्मविश्वास बाळगू नका. वेळच्या वेळी कामे करत राहा. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. पथ्य पाळा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल.
कुंभ: अनुकूल परिस्थिती राहील. पैशाचा ओघ सुरू राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. अचानक काही खर्च उद्भवतील. नियमानुसार वागण्याची गरज आहे. बेपर्वाई नको. मुलांच्या अडचणी समजून घ्या.
मीन: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यातून फायदा होईल. वादापासून स्वतःला दूर ठेवा. घरात किरकोळ कारणावरून गैरसमज होतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करा. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.