Magh Purnima 2024: आज केलेल्या दानाचे ३२ पट अधिक पुण्य मिळते; वाचा माघी पौर्णिमेचे महात्म्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:17 AM2024-02-24T10:17:07+5:302024-02-24T10:18:59+5:30

Magh Purnima 2024: २४ फेब्रुवारी रोजी अर्थात आज माघ पौर्णिमा आहे. माघ स्नानाला शास्त्रात महत्त्व आहे. महिनाभर नदीत स्नान करावे असा नियम देखील आहे. मात्र आताच्या काळात सगळेच नियम पाळणे शक्य नसले तरी काही तिथी वार पाळून आपण नियमांची अंशतः अंमलबजावणी करू शकतो. ही पौर्णिमा फार महत्त्वाची आहे. तिला बत्तीशी पौर्णिमा म्हणतात. का? ते जाणून घेऊ.

पौर्णिमेला ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच, मात्र सकाळी लवकर उठून स्नान करावे. शुचिर्भूत व्हावे. लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी स्तोत्र म्हणावे आणि यथाशक्ती पुरोहितांना तसेच गरजूंना दान धर्म करावा. या तिथीवर केलेल्या दान धर्माचे पुण्य ३२ पट अधिक मिळते असे शास्त्रात म्हटले आहे. म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात. या तिथीला भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची पूजा करावी. त्याचा विधी पुढीलप्रमाणे -

पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते तशी तिच्या भावाची अर्थात चंद्राची देखील पुजा केली जाते. चंद्रोदय झाल्यावर त्याला तुपाचे निरांजन दाखवून फूल वाहावे आणि वाटीत दूध साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा. चंद्राची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचेही जीवन चंद्रासारखे सौम्य, शीतल आणि प्रकाशमान बनेल.

लक्ष्मी पूजा करतेवेळी अकरा कवड्यांची माळ देवीच्या पूजेत ठेवा. पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवा. लक्ष्मीच्या कृपेने घरात धन, धान्य, संपत्ती यात बरकत होत राहील.

चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गायीच्या दुधाचे चंद्राला अर्घ्य द्यावे. असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते.