शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 01:33 PM2022-09-03T13:33:18+5:302022-09-03T13:37:29+5:30

लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला गेला असून, हा योग कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना अतिशय उत्तम मानला जात आहे. नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह या महिन्यात राशीपरिवर्तन करत आहेत. याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर प्रभाव राहणार आहे. तसेच या महिन्यात अनेक अद्भूत शुभ योगही जुळून येत आहेत. याचा सकारात्मक परिणाम काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकेल. (lakshmi narayan yoga in september 2022)

सप्टेंबर महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आपल्या स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत आहे. तसेच शुक्रही कन्या राशीत विराजमान होत आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीने शुभ योग जुळून आला आहे. याला लक्ष्मी-नारायण योग म्हटले जाते.

सप्टेंबर महिन्यात ३ ग्रह राशी बदलणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य आपले स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल आणि नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध १० सप्टेंबरला स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत वक्री होणार आहे.

कन्या राशीत जुळून येत असलेला लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला गेला आहे. हा योग बुद्धी आणि ज्ञानाने समृद्धी देतो, अशी मान्यता आहे. लक्ष्मी नारायण योग कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग शुभ ठरू शकेल. या महिन्यात तुम्ही एखाद्यासोबत नवीन भागीदारीत काम करू शकता. एखादा महत्त्वाचा व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल. नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. धातू व्यापार, रसायने आणि पेट्रोलियम उत्पादनांमध्ये कार्यरत असलेल्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकेल. विवाह करू इच्छिणाऱ्यांना या महिन्यात चांगला प्रस्ताव येऊ शकतो. यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग यशकारक ठरू शकेल. व्यावसायिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील. तसेच, अशा लोकांना नफा मिळू शकतो आणि व्यवसायात वाढ होऊ शकते. एवढेच नाही तर या काळात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे त्यांच्या अभ्यासात पूर्णपणे मन लागेल आणि त्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग प्रगतीकारक ठरू शकेल. करिअर सुरळीतपणे पुढे जाईल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आदर आणि पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. मालमत्ता विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे. मुलांच्या शिक्षणात तुमचा सहभाग वाढेल. सध्या केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला योग्य परतावा मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरू शकेल. या महिन्यात नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. नशिबाची उत्तम साथ लाभेल. उत्पन्न वाढल्याने तुमची बचतही वाढू शकेल. तुम्हाला रिअल इस्टेटच्या विक्रीतून पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक सकारात्मकता अनुभवता येईल. तुमचे मन खूप प्रसन्न राहील.

धनु राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग अनुकूल ठरू शकेल. अतिरिक्त उत्पन्नात वाढ होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली देयके वसूल होतील. इतकेच नाही तर या महिन्यात प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तूद्वारे लाभ मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कार्यालयातील वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकर्‍या बदलण्याची आशा बाळगणारे लवकरच सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकतात. तसेच अध्यात्मात तुमची रुची वाढेल.