झोपताना कोणत्या दिशेला डोके असणे मानले जाते शुभ? ‘या’ गोष्टी पाळा अन् मिळवा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:08 PM2021-10-21T12:08:32+5:302021-10-21T12:13:54+5:30

झोपण्याची दिशा योग्य असेल तर आर्थिकदृष्ट्याही लाभ होऊ शकतो, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. स्वप्नशास्त्र, समुद्रशास्त्र, हस्तरेषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंक ज्योतिष यांसारख्या माध्यमातून अनेकविध गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

यापैकी वास्तुशास्त्रात घराशी म्हणजेच वास्तुची निगडीत अनेक गोष्टींचा सखोल आणि विस्तृत अभ्यास करण्यात आल्याचे पाहायला मिळते. दिवसभर कष्ट, मेहनत, वणवण केली की, रात्री झोपल्यावर जीवाला शांतता लाभते. परंतु, झोपताना दिशाही अतिशय महत्त्वाची मानली जाते.

झोपताच्या दिशेबाबत अनेक लोकमान्यता असल्याचे पाहायला मिळते. मात्र, झोपताना दिशा योग्य नसेल, तर काही समस्या, अडचणी या दीर्घकाळपर्यंत आपली पाठ सोडू शकत नाही, असे सांगितले जाते. याउलट झोपण्याची दिशा योग्य असेल तर आर्थिकदृष्ट्याही लाभ होऊ शकतो, असे म्हटले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला डोके करून झोपणे अतिशय उत्तम मानले जाते. आरोग्यासाठी ते चांगले असते, असे सांगितले जाते. यामुळे मानसिक समस्या दूर होऊ शकतात. तसेच वैज्ञानिकदृष्ट्याही ते योग्य मानले गेले आहे. मात्र, चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेसह पूर्व दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जाते. पूर्वेला डोके करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सूर्योदयाची हीच दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली आहे.

जी व्यक्ती घरात एकटीच कमावणारी असेल किंवा नोकरी, व्यवसायाशी निगडीत काम करत असेल, अशा व्यक्तींनी आवर्जुन पूर्व दिशेला डोके करून झोपावे, असे सांगितले जाते. एवढेच नाही, तर विद्यार्थी वर्गासाठीही पूर्व दिशेला डोके करून झोपणे योग्य मानले जाते. यामुळे एकाग्रता वाढते, असे म्हटले जाते.

याशिवाय शास्त्रानुसार, ऋषी-मुनी यांच्यामते तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला झोपू नये, असे सांगितले जाते. जेवल्यानंतर लगेचच झोपू नये, असे म्हटले जाते.

तसेच जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे, असे सांगितले जाते. लवकर निजे, लवकर उठे; तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे, असे म्हटलेच आहे. याचप्रमाणे रात्री उशिरापर्यंत झोपू नये, लवकर झोपावे, असे सांगितले जाते.

याशिवाय झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करावे. शांत चित्ताने झोपावे. झोपताना विचार सकारात्मक ठेवावे. शक्य असल्यास झोपताना ध्यानधारणा करावी, असे म्हटले जाते.