Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

By देवेश फडके | Published: February 27, 2021 11:51 AM2021-02-27T11:51:20+5:302021-02-27T12:05:20+5:30

मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. मार्च महिन्यात आणखी कोणते सण-उत्सव आहेत, जाणून घेऊया... (March 2021 Vrat And Festival in Marathi)

फेब्रुवारी महिन्यात माघ महिन्याला सुरुवात झाली. तर मार्च महिन्यात मराठी महिन्यातील अखेरचा फाल्गुन महिन्याची सुरुवात होईल. मार्च महिन्यात अनेक सण-उत्सवांची रेलचेल आहे.

मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. मार्च महिन्यात आणखी कोणते सण-उत्सव आहेत, जाणून घेऊया...

माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी मंगळवार, ०२ मार्च २०२१ रोजी येत आहे. यंदाच्या वर्षी अंगारक योग जुळून येत असल्यामुळे ही संकष्ट चतुर्थी विशेष ठरणारी आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीला केलेल्या व्रतामुळे संपूर्ण वर्षभरात केलेल्या संकष्ट चतुर्थीचे व्रताचे पुण्य लाभते, असे मानले जाते.

शुक्रवार, ०५ मार्च २०२१ रोजी कालाष्टमी असून, याच दिवशी शेगावीचा योगीराणा अशी ओळख असलेल्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून देणारे गजानन महाराज सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

रविवार, ०७ मार्च २०२१ रोजी दास नवमी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देण्याचे काम समर्थ रामदास स्वामींनी केले.

सोमवार, ०८ मार्च २०२१ रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी केली जाते. तसेच हा दिवस जागतिक महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो. हवे असते तर ते आयुष्य आनंदाने घालवू शकले असते, परंतु त्यांनी अनेक समाजसुधारणेची कामे केली.

मंगळवार, ०९ मार्च २०२१ रोजी विजया एकादशी आहे. माघ महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे संबोधले जाते. शास्त्रांनुसार, विजया एकादशी सर्व व्रतांपैकी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे श्रीविष्णुंची शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

गुरुवार, ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रामाणिक अंतःकरणाने शिव-पार्वतीची पूजा केल्यास सर्व शुभ परिणाम मिळतात, असे मानले जाते.

रविवार, २१ मार्च २०२१ रोजी होलाष्टक आहे. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकाची सुरुवात होते. फाल्गुन शुद्ध अष्टमी ते फाल्गुल पौर्णिमा या कालावधीला होलाष्टक असे म्हटले जाते. या कालावधीत कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते.

गुरुवार, २५ मार्च २०२१ रोजी आमलकी एकादशी आहे. फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी असे संबोधले जाते. होळीच्या आधी येत असल्यामुळे या एकादशीला रंगभरी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी आवळाच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याचे सेवन करावे, असे म्हटले जाते.

रविवार, २८ मार्च २०२१ रोजी फाल्गुन पौर्णिमा असून, याच दिवशी होळी साजरी केली जाईल. या दिवशी रात्री होलिका दहन केले जाते. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

सोमवार, २९ मार्च २०२१ रोजी धूलिवंदन आहे. याच दिवशी वसंतोत्सवाला सुरुवात होते, अशी मान्यता आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीपर्यंत धुळवड साजरी केली जाते. फाल्गुन शुद्ध पंचमी रंगपंचमी म्हणूनही ओळखली जाते.

बुधवार, ३१ मार्च २०२१ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. फाल्गुन महिन्याच्या वद्य पक्षातील ही संकष्ट चतुर्थी आहे. एकाच महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येण्याचा हा दुसरा योग आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी आल्या होत्या.

Read in English