राहु-शुक्र दशा, राजयोग; रोहित-विराट भारताला वर्ल्ड कप जिंकून देतील का? निवृत्तीचेही संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:15 PM2023-10-14T14:15:24+5:302023-10-14T14:20:12+5:30

यंदाच्या वर्ल्ड कप विजयाचा भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ती कामगिरी करून दाखवू शकतील का? जाणून घ्या...

देशात सध्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचा माहोल आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने चांगली सुरुवात केली आहे. अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने शतक झळकवत अनेक जागतिक विक्रम केले. रोहित शर्माला पुन्हा एकदा लय आणि सूर गवसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आनंद झालेला आहे.

यापुढे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह अन्य तुलनेने बलाढ्य संघांचे आव्हान भारतासमोर असणार आहे. या सर्वांवर मात करत भारत वर्ल्ड फायनलमध्ये धडक मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली चांगलाच लयीत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अत्यंत कठीण परिस्थितीत संयमी खेळी करत विराटने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. भारतीय संघातील अन्य खेळाडूही आपापल्यापरिने साजेसा खेळ करत उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. यातच रोहित आणि विराट भारताला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतील का, याचा ज्योतिषीय दृष्टिकोनातून घेतलेला आढावा जाणून घेऊया...

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा जन्म नागपूर येथे २९ एप्रिल १९८७ रोजी झाला. रोहित शर्माची रास मेष असून, लग्न स्थानही मेष रास आहे. या स्थानी पंचमेश सूर्य, सहाव्या स्थानाचा स्वामी बुध विराजमान आहे. त्यामुळे बुधादित्य नामक एक शुभ मानला जाणारा राजयोग जुळून आला आहे.

मात्र, दशमेश शनी आठव्या स्थानात वक्री आहे. वक्री असलेल्या शनीची दुसऱ्या स्थानी असलेल्या मंगळावर दृष्टी पडत आहे. या ग्रहस्थितीमुळे रोहित शर्माला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. सध्या राहु आणि शुक्रातील सूर्याची विंशोत्तरी दशा सुरू आहे. ती २३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

ग्रहांचे पाठबळ आणि रोहित फॉर्मात उत्कृष्ट कामगिरी करून या स्पर्धेत सर्वोत्तम धावा करणारा किंवा सर्वाधिक वेळा सर्वोत्कृष्ट खेळी करणारा खेळाडू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. संघाला विजय मिळवून देण्यात रोहितचा वाटा मोलाचा ठरू शकतो.

वर्तमान काळात शनी कुंडलीतील लाभस्थानात अष्टकवर्गात ४५ अंकांवर वाटचाल करत आहे, त्यामुळे मोठ्या यशाची शक्यता आहे. मात्र मेष राशीतील चंद्र आणि बाराव्या स्थानी असलेल्या दशानाथ राहु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे अंतिम सामना जिंकण्यात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.

दुसरीकडे, ०५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत जन्मलेल्या विराट कोहलीची कुंडली धनु लग्नाची आहे. विराट कोहलीची रास कन्या आहे. दशम स्थानात असलेल्या शुक्राची दृष्टी चौथ्या स्थानी असलेल्या मंगळावर आहे. विराट कोहलीच्या कुंडलीतही सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग आहे. एकूणच ग्रहस्थितीमुळे विराटची कारकीर्द शानदार असल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीच्या कुंडलीतही राहु-शुक्राची दशा सुरू असून, त्यात शनीची विंशोत्तरी दशा सुरू आहे. राहु आणि शुक्र विराट कोहलीच्या जन्मपत्रिकेत ६/८ तसेच दशमांश कुंडतील २/१२ अशा प्रतिकूल स्थितीत असून, या स्पर्धेत विराटला सरासरी यश मिळू शकते, असा दावा केला जात आहे.

दीड वर्षांनंतर, जेव्हा शनि आणि राहु यांची मीन राशीत युती होईल, तेव्हा या संक्रमणाचा रोहित शर्माच्या कुंडलीत बाराव्या स्थानी आणि विराट कोहलीच्या चौथ्या स्थानावर प्रभाव पडू शकतो, ज्यामुळे या दोन महान खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात, असे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

पण तोपर्यंत या दोन्ही दिग्गजांनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले असतील. यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाबाबत बोलायचे झाल्यास भारताची कामगिरी उत्कृष्ट असेल, पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून भारताला या स्पर्धेचे जेतेपद पटकावणे वाटते तितके सोपे जाणार नाही, आव्हानांवर मात करून दाखवावी लागू शकते, असे म्हटले जात आहे.

- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.