Holi 2026: 'इथे' धगधगत्या चितेच्या राखेने खेळतात होळी, ३५० वर्षं जुनी परंपरा; काय आहे रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:56 IST2026-02-27T11:50:39+5:302026-02-27T11:56:57+5:30

Holi 2026 Celebration: यंदा होळीवर चंद्रग्रहणाचे(Lunar Eclipse 2026) सावट असले तरीदेखील परंपरेनुसार २ मार्च रोजी होलिका दहन(Holika Dahan 2026) ३ मार्च रोजी धुळवड(Holi 2026) आणि ८ मार्च रोजी रंगपंचमी(Rang Panchami 2026) साजरी केली जाईल. भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र काही खास ठिकाणांची होळी जगप्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, मथुरा, वृंदावन, बरसाणे, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात. तेथील होळी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या शहरांमध्ये होळीचा सण प्राचीन काळापासून खेळला जात आहे. काशी येथे मात्र वेगळाच प्रकार बघायला मिळतो!

काशी हे देखील अशाच शहरांपैकी एक आहे, जिथे होळीनिमित्त रंगांची मुक्त उधळण बघायला मिळते. साधू संत कृष्ण रंगात रंगून होळी खेळतात. त्याचबरोबर तिथले शिवभक्त भोलेनाथसोबत होळी खेळतात, पण ही होळी फारच वेगळी असते. ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. यंदा ३ मार्च रोजी धुळवड आहे, त्यानिमित्त होळीचा हा अनोखा प्रकार जाणून घेऊया.

काशीच्या स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी खेळली जाणारी होळी बाकी ठिकाणच्या होळीपेक्षा खूप वेगळी असते. कारण इथे रंगांनी नव्हे तर चक्क स्मशानातील चितेच्या राखेने होळी खेळली जाते. ही शिवभक्तांची होळी असते, ती ही देवाधिदेव महादेव यांच्याबरोबर! पण होळी खेळण्याइतकी राख येते कुठून?

मोक्ष देणाऱ्या काशी शहरातील स्मशानभूमी हरिश्चंद्र घाट येथे चोवीस तास चिता धगधगत असते. इथे चितेची आग कधीच थंड होत नाही असे म्हणतात. काशी क्षेत्री आपला शेवट व्हावा या इच्छेने अनेक भाविक वृद्धावस्थेत काशी क्षेत्री येऊन राहतात.

मृत्यू आपल्या हाती नाही, परंतु मृत्यूचा सोहळा जिवंत पणी अनुभवण्यासाठी तिथल्या स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी चितेच्या राखेने होळी खेळली जाते. आपण सगळे जण राखेतून जन्माला आलो आणि राखेतच आपला शेवट होणार आहे, याची जाणीव देणारी ही प्रथा पारंपरिक पद्धतीने पाळली जाते.

या वर्षी २७ फेब्रुवारीला आपण आमलकी एकादशी साजरी केली, त्याच दिवशी काशी येथे रंगभरी एकादशी साजरी केली जाते. काशीत हा उत्सव एकादशीपासून सुरु होतो. या दिवशी वाराणसीतील स्मशानभूमीत रंगांसह चितेच्या राखेची होळी खेळण्यात आली. या वेळी डमरू, घंटा, घरियाल, मृदंग अशा भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या वाद्यांमधून निघणारे संगीत वातावरण निर्मिती करते. नेहमीप्रमाणे या वर्षीही हा सोहळा सुरु झाला आहे. तो रंगपंचमीपर्यंत सुरु राहील. ही परंपरा अलीकडची नाही तर तब्ब्ल ३५० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.

यामागची कथा अशी आहे की, लग्नानंतर माता पार्वती शिवशंकराबरोबर काशीला पोहोचली. त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ शिवगणांनी स्मशानातील राख उधळून होळी साजरी केली. भगवान शंकरासकट सगळे शिवगण स्मशान वासी असल्याने त्यांनी धुळवडीसारखी स्मशानातील राखेने होळी खेळली. भूत, प्रेत, पिशाच आणि अघोरीं शक्तीही सामील झाल्या.तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरू आहे. आजही ही परंपरा येथे सुरू असून हरिश्चंद्र घाटावर महाशमशन नाथांच्या आरतीने सुरुवात होते. येथील डोम राजाच्या कुटुंबाने याचे आयोजन केले आहे.