शनी देवाच्या कृपेने पुढचे सहा महिने 'या' राशी निवांत आयुष्य जगातील, संधीचे सोने करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:54 AM2021-10-16T10:54:39+5:302021-10-16T10:59:40+5:30

सर्व ग्रहांमध्ये शनी देव हे एकमेव असे कडक शिक्षकी आहेत, जे एकाच वेळी अनेक राशींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या नजरेत येणाऱ्या राशींना सतर्क राहावे लागते, तर त्यांची पाठ ज्या राशींच्या दिशेने असते, त्या राशींना काही काळ दिलासा असतो. यानुसार सध्या शनिदेव आपल्या स्वतःच्या राशीघरात अर्थात मकर राशीत विराजमान असल्याने तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या सहा राशींवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे आपसुखच बाकीच्या सहा राशी मजेत आहेत.

त्यातही पुढील तीन राशींना सध्या अनुकूल ग्रहस्थिती असल्यामुळे आगामी काळ त्यांच्यासाठी निवांत असणार आहे. या अनुकूल स्थितीत शक्य तेवढी चांगली कामे उरकून घ्या. कारण ग्रहदशा अनुकूल व्हायला बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे निवांत शब्दाचा अर्थ शिथिल किंवा आळशी असा न घेता अनुकूल असा घ्या आणि कामाला लागा.

ज्योतिष शास्त्रानुसार, ११ ऑक्टोबर पासून पुढील तीन राशीतील लोकांसाठी आरामचे दिवस सुरू झाले आहेत. ऑक्टोबर २०२१ ते २९ एप्रिल २०२२ पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या कारणास्तव, हा संपूर्ण वेळ 3 राशींसाठी खूप चांगला असेल.या ग्रहस्थितीमुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. जाणून घ्या त्या तीन भाग्यवान राशी...

मेष राशीच्या लोकांना आगामी काळात नोकरी व्यवसायात चांगला धनलाभ होऊ शकणार आहे. प्रयत्नात कसूर करू नका. वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करा. तरच यशाचे सुमधुर फळ चाखता येईल. आयुष्य आनंदाने जगता येईल. रोजगाराच्या अनेक संधी दार ठोठावतील. आर्थिक भरभराट झाल्याने अन्य प्रश्नदेखील मार्गी लागतील. एकंदरीत हा काळ अतिशय शुभ राहील.

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती येत्या काळात खूप चांगली राहील. त्यांना उत्तरोत्तर प्रतिष्ठा मिळेल. यश मिळेल. जर तुम्ही नवीन काम करणार असाल तर त्यातही फायदा होईल. भौतिक सुविधा वाढतील. ऐषारामी जीवन जगण्याचे तुमचे स्वप्न साकार करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. तिचे सोने करा. २०२२ ची सुरुवात दणक्यात करता येईल.

कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये पदोन्नती होईल. पगारवाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे वैयक्तिक आयुष्य आनंददायी ठरेल. कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल. या काळात अहंकाराचा वारा लागू देऊ नका. लक्ष्मी जेवढ्या वेगाने येते, तेवढ्या वेगाने रुष्ट होऊन जाऊ शकते. त्यामुळे अध्यात्माशी जोडलेले राहा. खूप प्रगती होईल.