गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:17 IST2024-12-11T11:00:51+5:302024-12-11T11:17:02+5:30
Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे. कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव, दत्तगुरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या...

Datta Jayanti 2024: मार्गशीर्ष महिना सुरू आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
तसेच दत्त जयंतीला चंद्र वृषभ राशीत असणार आहे. वृषभ राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून आला आहे. हा योग राजयोगाप्रमाणे फले देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून आल्याने याचे महत्त्व वाढले आहे.
दत्त जयंतीला दत्तगुरुंचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना केली जाते. या निमित्ताने कोणत्या राशींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल? कुटुंब, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर गजकेसरी योग शुभकारक ठरू शकेल? जाणून घेऊया...
मेष: नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व फायदे होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. कामाचा ताण जाणवणार नाही. धनलक्ष्मीची कृपा राहील. थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. या काळात कामे करताना घाई करू नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका.
वृषभ: ग्रहमान अनुकूल राहील. बोलण्याला किंमत दिली जाईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मोठेपणा मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कुणी मदत मागितली तर नीट विचार करून निर्णय घ्यावा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. काही लोक म्हणावी तशी साथ देणार नाही. आर्थिक देवाणघेवाण करताना थोडी काळजी घ्यावी. जीवनसाथीची चांगली साथ राहील. अडलेली कामे मार्गी लागतील.
मिथुन: आर्थिक आवक चांगली राहील. आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. गरज असते तेव्हा अडचण जाणवेल. थोडे बचतीचे नियोजन करा. भावंडांशी सलोखा ठेवा. जीवनसाथीची काळजी घ्यावी. सुरुवातीला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्क: अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काही अडचणी असतील. थोडा संयम बाळगला तर आणि सकारात्मक पद्धतीने विचार केला तर त्या दूर होण्यास वेळ लागणार नाही. अचानक धनलाभ होऊ शकतो. लोकांच्या भरवशावर राहून मोठी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात. अनपेक्षित पाहुणे घरी येतील.
सिंह: प्रलंबित कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. नवनवीन वाढलेल्या कामामुळे व्यस्तता अधिक वाढेल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. संयमाने वागण्याची गरज आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. वाहने जपून चालवा. लोकांशी बोलताना मनावर ताबा ठेवा. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल.
कन्या: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. अनुकूल परिस्थिती राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मोहात पडून नुकसान करून घेऊ नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पर्यटनाचे बेत ठरतील.
तूळ: सगळे व्यवहार चोख ठेवण्याची गरज आहे. अनावश्यक दगदग वाढेल. विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळेल, अशी कामे करू नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांची काळजी घ्यावी. जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात सतर्क राहा. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र, नीट माहिती घ्यावी.
वृश्चिक: साधकबाधक अनुभव येतील. नोकरीत कामाचा ताण राहील. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. कामे आटोक्यात येतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्यावा. त्यासाठी संवाद साधा. जवळचा प्रवास होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. काही लोक तुमच्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवाल.
धनु: सामंजस्याचे धोरण ठेवा. काही गैरसमज झाले तरी ते लवकरच मिटतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. वेळापत्रक व्यस्त होईल. काही कारणांनी प्रवास घडून येईल. शेजारच्या लोकांशी वाद टाळा. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. विचारपूस करावी. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करा.
मकर: विविध क्षेत्रांत हातून चांगली कामगिरी होईल. व्यवसायात नवनवीन संधी मिळतील. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. बोलण्याचा प्रभाव पडेल. कुणाचा अपमान करू नका. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. नवीन ओळखी होतील. कामे होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे सावधपणे करा. भावंडांशी गैरसमज टाळा.
कुंभ: व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील. थोडा संयम ठेवला तर परिस्थिती चांगली होईल. मालमत्तेची कामे करताना कागदपत्रे नीट वाचून घ्यावीत. कुठेही सही करू नका. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. खूप तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. नोकरीत बढती, बदलीची शक्यता आहे.
मीन: अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील; पण ओळखीमुळे कामे होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात अकारण काळजीचे विचार येतील. प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार रुजवा. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील, भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.