बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:38 IST2025-11-27T13:29:07+5:302025-11-27T13:38:06+5:30

Baba Venga's prediction 2026: बुल्गारियाची रहस्यमय अंध महिला बाबा वेंगा (Baba Vanga prediction 2026) यांनी दशकांपूर्वी केलेल्या भविष्यवाणी आजही चर्चेचा विषय ठरतात. अनेक जागतिक घटना त्यांच्या भविष्यवाणीशी जुळल्याचे मानले जाते. २०२६ वर्षाबाबतही त्यांनी एक भाकीत करून ठेवले आहे. जे चिंताजनक आहे.

२०२६ सुरु होण्यासाठी उरला जेमतेम एक महिना. नवीन वर्षाची नवीन स्वप्न आपण रेखाटत असताना अशी एखादी भविष्यवाणी ऐकली की मन अस्वस्थ होते. मग या घटना स्थानिक असो, राष्ट्रीय असो नाहीतर आंतरराष्ट्रीय. त्याचा परिणाम सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनावरही होतोच. अशी काय भविष्यवाणी बाबा वेंगाने २०२६ बाबत केली आहे? चला पाहू.

बाबा वेंगा यांनी २०२६ साठी केलेली सर्वात मोठी आणि भीतीदायक भविष्यवाणी म्हणजे "पूर्वेकडून एक वादळ उठेल, जे पश्चिमेला राखेत बदलेल." या विधानाचा अर्थ असा की जगाचे लक्षणीय नुकसान करणारे मोठे युद्ध किंवा संघर्ष पाश्चिमात्य देशांमध्ये होणार आहे, असा लावला जात आहे. हे युद्ध केवळ एका देशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेईल.

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, "राख आणि रक्ताच्या ढिगाऱ्यातून" एक 'शक्तिशाली नेता' उभा राहील, जो 'जगाचा स्वामी' (Lord of the World) म्हणून उदयास येईल, असेही त्यांनी सांगितले होते. तो 'विश्वगुरू' नक्की कोण असेल हे येणारा काळ सांगेल.

बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, निसर्गाचा कोप २०२६ मध्ये अधिक क्रूर स्वरूप धारण करेल. "पृथ्वी आता आणखी सहन करणार नाही," असे त्यांनी म्हटले होते. २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक आणि वादळांची एक अशी मालिका येईल, जी जगाचा नकाशा बदलू शकते.

या प्राकृतिक आपत्तींमुळे पृथ्वीचा अंदाजे एक दशांश (1/10th) भाग नष्ट होईल, असे त्यांनी सांगितले होते, ज्यामुळे नैसर्गिक बदलांबद्दलचे भय वाढले आहे. हा दहावा भाग नेमका कोणता असेल या विचाराने प्रत्येक देशावर जणू मृत्यूची टांगती तलवार असणार आहे.

त्यांच्या भविष्यवाण्यांपैकी एक अशी आहे, जी आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) काळात खरी ठरताना दिसत आहे. वेंगा म्हणाल्या होत्या, "ती वेळ येईल, जेव्हा माणूस स्वतःच्या बनवलेल्या बुद्धिमत्तेचा (Artificial Mind) गुलाम होईल.''

याचा अर्थ असा लावला जातो की २०२६ मध्ये टेक्नॉलॉजी इतक्या शक्तिशाली होतील, की त्या स्वतः विचार करून निर्णय घेतील. माणूस त्यांचा गुलाम होईल आणि एक नवीन 'डिजिटल साम्राज्य' जगात जन्माला येईल. तिच्याशी जुळवून न घेतल्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल.

वेंगा यांनी २०२६ हे ब्रह्मांडीय रहस्यांचे वर्ष असल्याचे देखील सूचित केले होते. त्या म्हणाल्या होत्या, "आकाशातून प्रकाश नाही, तर अंधार उतरेल आणि जे उतरेल ते आपल्यासारखे नसेल. एका वेगळ्या जगाशी आपला परिचय होईल, जो आपले डोळे दिपून टाकेल. "

ही भविष्यवाणी एलियन्स पृथ्वीवर येण्याचे (Alien Contact) निर्देशित करते. एक 'विशाल अंतराळयान' पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि माणूस पहिल्यांदाच हे स्वीकारेल की तो या ब्रह्मांडात एकटा नाही. तर इतर ग्रहांवरही साम्राज्य आहे, जे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे.

बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी आजही वैज्ञानिक कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत, परंतु त्यांच्या काही भविष्यवाणींशी आजच्या जगातील राजकारण, तंत्रज्ञान आणि हवामान बदल यांचा संबंध जोडला जातो, ज्यामुळे २०२६ या वर्षाबद्दलची उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढली आहे.