वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:22 IST2025-12-30T13:15:15+5:302025-12-30T13:22:58+5:30
Baba Vanga Story: बाबा वेंगा(Baba Venga Story) नावाची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याचीही माहिती नसणारे लोक एकाएक त्यांच्या भविष्यवाण्यांचे दावे करू लागले. हे बाबा वेंगा नेमके कोण? त्यांची सगळीच भाकिते खरी ठरली का? ती लिखित आहेत का? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

जगाच्या इतिहासात असे काही लोक होऊन गेले ज्यांच्या शब्दांनी संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले. अशाच एक गूढ व्यक्तिमत्व म्हणजे बल्गेरियातील 'बाबा वेंगा'. डोळ्यांनी पाहू शकत नसूनही त्यांनी जगाच्या भविष्याबद्दल जे काही सांगितले, त्यातील अनेक गोष्टी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. त्यामुळेच त्यांना 'बाल्कनचे नॉस्ट्राडेमस' असेही म्हटले जाते.

कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोव्हा होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९११ रोजी झाला. असे म्हटले जाते की, लहानपणी एका भीषण वादळात सापडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र, दृष्टी गेल्यानंतर त्यांच्यात 'भविष्य पाहण्याची' एक अजब शक्ती निर्माण झाली, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. ९/११ चे हल्ले असोत किंवा सोव्हिएत संघाचा ऱ्हास, अनेक मोठ्या जागतिक घटनांशी त्यांचे नाव जोडले जाते. ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे निधन झाले.

बाबा वेंगांच्या ५ गाजलेल्या भविष्यवाण्या
१. ९/११ चे दहशतवादी हल्ले (२००१): बाबा वेंगा यांनी म्हटले होते की, "स्टीलचे पक्षी अमेरिकेतील जुळ्या भावांवर हल्ला करतील आणि निष्पाप लोकांचे रक्त सांडेल." न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर जेव्हा विमानांनी (स्टीलचे पक्षी) हल्ला केला, तेव्हा ही भविष्यवाणी जगभर चर्चेत आली.

२. सोव्हिएत युनियनचा ऱ्हास (१९९१): "एक मोठे लाल साम्राज्य तुटेल," असे त्यांनी भाकीत केल्याचे सांगितले जाते. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर हे विधान त्यांच्या नावाने प्रचंड गाजले.

३. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७): एका अत्यंत लोकप्रिय आणि तरुण महिलेचा अपघाती मृत्यू होईल, असे त्यांनी वर्तवले होते. ब्रिटनची राजकन्या डायना हिचा पॅरिसमध्ये कार अपघातात मृत्यू झाल्यावर या भविष्यवाणीचा संदर्भ दिला गेला.

४. बराक ओबामा यांची निवड: अमेरिकेला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. बराक ओबामा यांच्या निवडीनंतर हे विधान खरे ठरल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांनी ओबामा हे 'शेवटचे' अध्यक्ष असतील असेही म्हटले होते, जे चुकीचे ठरले.

५. कुर्स्क पाणबुडी दुर्घटना (२०००): "कुर्स्क पाण्यात बुडेल आणि संपूर्ण जग हळहळेल," ही त्यांची भविष्यवाणी रशियन पाणबुडीच्या भीषण अपघाताशी जोडली जाते. तसेच जगभरात कोविड सारखी महामारी येईल, जी २०२० मध्ये खरी ठरली.

बाबा वेंगा यांनी स्वतः कधीही काहीही लिहून ठेवले नाही. त्यांच्या बहुतेक भविष्यवाण्या या तोंडी परंपरेने किंवा त्यांच्या मृत्यूनंतर लोकांकडून पसरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे भाकीत योगायोग म्हणावा की दूरदृष्टी हे ठामपणे सांगता येत नाही.

त्यांची विधाने अनेकदा रूपकात्मक आणि अस्पष्ट असतात. त्यामुळे घडलेल्या घटनेनुसार लोक त्याचा अर्थ सोयीनुसार लावतात. येत्या काळाच्या बाबतीतही त्यांनी अनेक चांगली वाईट विधाने केली आहेत, मात्र ती लिखित नसल्याने त्यावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे.

त्यांनी २०१० ते २०१४ दरम्यान तिसरे महायुद्ध होईल असे म्हटले होते, जे चुकीचे ठरले. त्यामुळे या भाकितांकडे केवळ मार्गदर्शन म्हणून पाहिले तर भीती वाटणार नाही आणि यातून चांगल्या गोष्टी घडल्या तर आनंदच होईल, नाही का?

















