संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:24 IST2025-11-12T14:14:01+5:302025-11-12T14:24:50+5:30
Ayodhya Ram Mandir New Look Photos: २५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नवा राम मंदिर परिसर पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधला जात आहे.

Ayodhya Ram Mandir New Look Photos: २२ जानेवारी २०२४ राम जन्मभूमी मंदिरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत सुरू असलेला भाविकांचा ओघ किंचितही कमी झालेला नाही. यातच आता राम मंदिर परिसरातील काम पूर्णत्वास जात असून, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी आणखी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

राम मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे.

आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे.

मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे.

संपूर्ण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत येत आहेत. त्यावेळी हा सोहळा सुमारे ६ ते ८ हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार आहे.

राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘राम परिवार’ आसनस्थ झाला असून मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या शीर्षस्थानी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील.

याच राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबारही पूर्ण झाला आहे. यातच आता राम जन्मभूमी मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण झाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. यातच देश-परदेशातील भाविकांनी राम मंदिरासाठी तब्बल ३ हजार कोटींचे दान दिल्याची माहिती मिळाली आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन मोहिमेदरम्यान, भारत आणि परदेशातील लाखो रामभक्तांनी मुक्त हस्ताने योगदान दिले. ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम रामलला चरणी अर्पण केली. इमारत बांधकाम समितीच्या अध्यक्षांच्या मते, आतापर्यंत अंदाजे १,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.

दरम्यान, २५ नोव्हेंबर २०२५ च्या भव्य सोहळ्यापूर्वी राम मंदिर परिसराचे नवीन फोटो आता समोर आले आहे. राम मंदिर हे आणखी भव्य दिव्य झाल्याचे यातून पाहायला मिळत आहे. दिवाळीतही राम मंदिरावर मोठी रोषणाई करण्यात आली होती.

राम मंदिराच्या शिखराचे, गर्भगृहाचे आणि संपूर्ण संकुलाची दिव्य दृश्ये समोर आल्यामुळे राम भक्तांमध्ये आनंद पसरला आहे. राम मंदिराची प्रगती, पूर्णता आणि बांधकामाच्या अंतिम टप्प्यांबद्दल माहिती देण्यासाठी ट्रस्टने नवीन फोटो प्रसिद्ध केले.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ आले आहे. राम मंदिराचे भव्य स्वरुप पाहून रामललाचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या भाविकांचा उत्साह द्विगुणित होत आहे. "जय श्री राम" च्या जयघोषात मंदिर परिसर दणाणून जात आहे.

लाखो भाविक अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. पूजन करत आहेत. संपूर्ण अयोध्या शहरात पुन्हा एकदा आता भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य गर्भगृह आणि राम मंदिराच्या शिखराचे बहुतेक काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

हा ध्वजारोहण सोहळा केवळ मंदिराच्या बांधकाम पूर्ण होण्याचे प्रतीक नाही तर अयोध्येतून संपूर्ण जगाला एकता, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीचा संदेश देईल, असे म्हटले जात आहे. तसेच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षित भेटीसाठी अयोध्या प्रशासन आणि ट्रस्ट युद्ध पातळीवर तयारी करत आहेत. राम मंदिर संकुलात स्वच्छता, सजावट आणि सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली जात आहे. संपूर्ण अयोध्या शहरात स्वागतद्वार, भव्य कमानी आणि आकर्षक रोषणाई केली जात आहे. अयोध्येत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राम मंदिर ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या नवीन छायाचित्रांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की अयोध्या आता आपला वैभवशाली सांस्कृतिक वारसा जगासमोर पूर्ण भव्यतेने सादर करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.

संपूर्ण राम मंदिर परिसराचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रामललाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे.

















