राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:12 IST2025-11-25T19:04:51+5:302025-11-25T19:12:37+5:30
Ayodhya Ram Mandir Dharma Dhwaj: राम मंदिरावरील धर्मध्वजारोहणाचा भव्य दिव्य सोहळा संपूर्ण देशवासीयांनी अनुभवला. परंतु, राम मंदिरावरील ध्वज, ध्वजावरील चिन्हे नेमके काय दर्शवतात? जाणून घ्या...

Ayodhya Ram Mandir Dharma Dhwaj: २५ नोव्हेंबर २०२५ हा दिवस भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर उभे राहिलेले राम मंदिर पूर्ण झाले, हेच या धर्मध्वजारोहणातून दिसून येते. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली होती. अगदी तसाच भव्य दिव्य सोहळा पुन्हा एकदा अयोध्येसह संपूर्ण देशवासीयांनी अनुभवला.

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य निर्माण कार्य आता पूर्ण झाले असून, ध्वजारोहण हा त्याच्या पूर्णत्वाची अधिकृत घोषणा आहे. हे केवळ एक विधी नाही, तर मंदिराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पूर्णतेचे प्रतीक आहे.

वैदिक शास्त्रांनुसार, कोणत्याही मंदिरात शिखरावर धर्म ध्वज (भगवा पताका) फडकवणे अनिवार्य आहे. हा ध्वज देवतेची उपस्थिती, शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर हा विधी उशिरा होतो, कारण तो मंदिराच्या सात्विक ऊर्जेला सक्रिय ठेवतो. शिखरावर भगवा धर्मध्वज फडकवला की मंदिराचे निर्माण पूर्ण झाले आणि देवतेची प्राणप्रतिष्ठा पूर्णत्वास गेली असे मानले जाते.

५०० वर्षांच्या संघर्षानंतर मंदिराचे पूर्णत्व साजरे करण्यासाठी हा क्षण निवडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १६१ फूट उंच शिखरावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद भगवा ध्वज फडकवला. प्राचीन काळी प्रत्येक देवालयात धर्मध्वज अनिवार्य असायचा. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर पुन्हा अयोध्येत ही परंपरा जिवंत झाली, ही भारतीय संस्कृतीची पुनर्प्राप्ती आहे.

धर्मध्वज म्हणजे स्वतः भगवान रामांची पताका. हा ध्वज फडकल्यावर मंदिरात श्रीरामांचे संपूर्ण वैभव, शक्ति आणि संरक्षण सतत कार्यरत राहते असे शास्त्र सांगते. शिखरावरील ध्वज मंदिरातील सात्विक ऊर्जेला दिशा देतो, नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतो आणि भाविकांना दर्शनाचा पूर्ण फळ प्राप्त होण्यास मदत करतो.

हा भगवा ध्वज केवळ राम मंदिराचा नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या संकल्प, तपश्चर्या आणि विजयाचा झेंडा आहे. म्हणूनच देशभरातून लाखो लोकांनी हा क्षण उत्सव म्हणून साजरा केला. शिखरावरील भगवा धर्मध्वज म्हणजे स्वतः मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचा विजयपताका; जो सांगतो की अयोध्येत पुन्हा रामराज्य अवतरले आहे!

राम मंदिरावर डौलाने फडकलेला धर्मध्वज अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. यावर एक वृक्ष, सूर्य आणि ओम आहे. धर्म ध्वजावरील झाडाचे नाव कोविदार वृक्ष आहे. तो कांचनार वृक्षासारखा दिसतो. मात्र पारिजात आणि मंदार यांचा संकर असलेला हा वृक्ष आहे. हा वृक्ष रघुकुल रित दाखवणारा आहे. स्वतः उन्हात उभे राहून सगळ्यांना सावली देणारा हा वृक्ष आहे. असे वृक्ष सत्पुरुषांसारखे असतात. कांचनार वृक्षाचा उपयोग औषधांमध्येही होतो आणि अन्नातही होतो.

कोविदार वृक्षाला जगातील पहिला संकरित वृक्ष मानले गेले आहे. कश्यप ऋषींनी मंदार आणि पारिजात या दोन झाडांच्या संकरातून कोविदार वृक्षाची निर्मिती केली. या वृक्षाला कांचन वृक्ष, आपटा, कांचनार अशीही नावे आहेत. कोविदार वृक्षाचे नाव बॉहिनिया व्हेरिएगेटा असे आहे. संस्कृत भाषेत या वृक्षाला कांचनार असे म्हटले जाते. या वृक्षाची उंची १५ ते २५ मीटर पर्यंत असते. हा वृक्ष पानांनी आणि फुलांनी डवरलेला असतो.

कोविदार वृक्ष हिमालयाचा दक्षिणी भाग, पूर्व भाग आणि दक्षिण भारतात आढळतो. कोविदार वृक्षाच्या सत्त्वाचा उपयोग त्वचेच्या रोगांसाठी होतो. तसेच याची साल पोटाचे विकार बरे करणारी गुणकारी साल आहे. असा बहुगुणी कोविदार वृक्ष राम राज्यात त्यांच्या ध्वजावर होता आणि राष्ट्रीय प्रतीक होता.

वाल्मिकी रामायणात कोविदार वृक्षाचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह वनवासात गेले. भरताला जेव्हा रामाला वनवासात पाठवण्यात आले आहे हे समजले, तेव्हा तो रामाची समजूत काढण्यासाठी आणि रामाला पुन्हा अयोध्येत परत या, अशी विनंती करण्यासाठी चित्रकूट पर्वतावर भेटायला गेला होता.

त्यावेळी अयोध्येतील सैन्यही भरतासह आले होते. वनवासात देखरेखीची जबाबदारी लक्ष्मणावर होती. त्याने एका झाडावर बसून हे पाहिले की, एक सैन्य त्यांच्या दिशेने येत आहे. त्याने रामाला याबाबत सांगितले.

रामाने कोविदार वृक्षाची खूण पाहिली आणि लक्ष्मणाला सांगितले की, हे आपल्याच अयोध्येचे ध्वज आहेत. भरताने रामाची भेट घेतली पण रामाने वनवास पूर्ण करणार हे सांगितले. त्यानंतर भरताने रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन येत अयोध्येत रामाचा प्रतिनिधी म्हणून १४ वर्षे राज्य केले.

















