Astro Tips: शास्त्रानुसार 'या' काळात पती पत्नीने पाळावे ब्रह्मचर्य; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:35 IST2025-03-26T13:26:57+5:302025-03-26T13:35:33+5:30
Astro Tips: शारीरिक संबंध हा कोणत्याही वैवाहिक नात्याचा एक अविभाज्य भाग आहे, मात्र तेच या नात्याचे सर्वस्व नाही. सप्तपदीच्या वेळी पती पत्नी एकमेकांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्तरावर एकमेकांना सहकार्य करण्याचे वचन देतात. त्या दृष्टीने आधी धार्मिक सहभाग, मग आर्थिक सहभाग, नंतर काम अर्थात शारीरिक सहभाग आणि शेवटी आपसूकच मोक्षपदी जाण्यासाठी सहभाग अपेक्षित आहे. म्हणून ब्रह्मचर्य पाळण्याबाबत नियम जाणून घ्या.

विवाह आणि ब्रह्मचर्य या दोन्ही गोष्टी तुम्हाला कदाचित परस्पर विरुद्ध वाटू शकतील. मात्र तसे नसून वैवाहिक जीवनातही काही निमित्त, प्रसंग असे येतात जेव्हा जोडप्याने ब्रह्मचर्य पाळायचे असते. म्हणजेच शारीरिक संबंध ठेवायचे नसतात. असे का? तर कामजीवनात पूर्णपणे गुंतून न राहता काही प्रसंगात सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून कर्तव्य करणे अपेक्षित असते. मग ते कर्तव्य धार्मिक असो नाहीतर सामाजिक. त्याबाबत शास्त्राने सांगितलेले नियम जाणून घेऊ.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत भक्त मातृभक्तीमध्ये रमून जातात. ते देवी मातेची पूजा करतात आणि संपूर्ण नऊ दिवस किंवा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प करतात. अशा स्थितीत या पवित्र प्रसंगी स्त्री-पुरुषाने शारीरिक संबंध ठेवू नयेत. तर ईश्वरभक्तीत समर्पण करावे, अन्यथा संसारात वाढते नकारात्मकता!
शास्त्रानुसार अमावस्येला पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत. अमावस्या तिथीला वाईट शक्तींचा प्रकोप होतो आणि अशा वेळी शारीरिक संबंध ठेवल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात. या तिथीला नातेसंबंध निर्माण केल्याने आयुष्यात वाईट शक्तींचा प्रवेश होण्याची शक्यताही वाढू शकते.
पती-पत्नी किंवा कोणत्याही प्रेमळ जोडप्याने संक्रांतीला म्हणजेच सूर्याच्या राशी बदलाच्या दिवशी संबंध ठेवू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की संक्रांतीच्या दिवशी संबंध ठेवल्याने कुंडलीतील रवी ग्रह कमकुवत होतो, ज्यामुळे मान-सन्मान कमी होतो.
तसेच कोणत्याही महिन्याच्या चतुर्थी आणि अष्टमी तिथीला पती-पत्नीने अंतर राखले पाहिजे, म्हणजेच संबंध प्रस्थापित करू नयेत. गणेश तसेच देवीची ही तिथी असल्याने या दोन्ही तिथीला संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना करावी, पण शक्यतो संबंध ठेवू नयेत.
श्राद्धाच्या वेळी पितरांची पूजा केली जाते आणि पंधरा दिवस पितरांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी उपाय केले जातात. अशा वेळी मन, शरीर शुद्ध ठेवण्यास सांगितले जाते. अशा स्थितीत श्राद्ध किंवा पितृ पक्षाच्या काळात पती-पत्नीने कधीही शारीरिक संबंध ठेवू नयेत, याचा विचारही करू नये.
शास्त्रानुसार कोणतेही व्रत आणि पूजा करताना भक्ताने ब्रह्मचारी राहावे. तरच व्रत किंवा उपासनेचे शुभ फल प्राप्त होते. हे सर्व नियम आपल्या तना-मनाची शुद्धी राखावी यासाठी आहेत, त्याला बंधन न मानता ते व्रत समजून पालनकरावे.
कोणत्याही मंदिराच्या परिसरात किंवा मंदिराच्या आजूबाजूच्या कोणत्याही ठिकाणी शारीरिक संबंध ठेवणे हे महापाप आहे. कारण आपण तिथे मनःशांतीसाठी आणि देवाच्या भक्तीसाठी जातो. अशा स्थितीत मंदिर आणि परिसरात अशी कृत्ये करण्यास पूर्णपणे बंदी आहे.
मूल होण्याच्या उद्देशाने जोडप्याचा संबंध ठेवण्याचा विचार असेल तर त्यांनी स्थळ आणि तारखेची विशेष काळजी घ्यावी. वर नमूद केलेल्या निषिद्ध तिथी आणि ठिकाणी संबंध कधीही स्थापित करू नयेत. होणाऱ्या बाळावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.