Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:15 IST2025-11-10T17:10:58+5:302025-11-10T17:15:48+5:30
Astro Tips: हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा गणपती तसेच हनुमानाला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा आणि हनुमान चालीसा पठण केल्याने जीवनातील दुःखातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट कार्ये करणे वर्जित (निषिद्ध) मानले जाते. ही कामे केल्यास जीवनात आणि व्यवसायात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्या ५ चुका कोणत्या ते जाणून घेऊ.

१. कर्ज घेणे किंवा देणे टाळा
मंगळवारी कर्ज घेणे किंवा देणे शुभ मानले जात नाही. या दिवशी कर्ज घेतल्यास ते वाढण्याची शक्यता असते आणि दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते. जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल, तर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करणे खूप लाभदायक ठरते.

२. केस, नखे कापणे किंवा दाढी (शेव्हिंग) करणे
शास्त्रांनुसार, मंगळवारी केस किंवा नखे कापणे तसेच दाढी करणे टाळावे. असे केल्यास धनहानी होते आणि आर्थिक समस्या वाढतात. मंगळवारी केस कापल्यास व्यक्तीचे आयुष्य ८ महिन्यांनी कमी होते आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतो, असे मानले जाते. बुधवार तसेच शुक्रवार या गोष्टींसाठी योग्य मानला जातो.

३. काळे वस्त्र आणि शृंगाराचे साहित्य खरेदी करणे
या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र, जमीन, लोखंड आणि शृंगाराचे साहित्य खरेदी करणे अशुभ मानले जाते. यामुळे जीवनात समस्या, करिअरमध्ये अडथळे आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. याउलट मंगळवारी नारंगी आणि लाल रंगाचे वस्त्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

४. मोठा नवीन व्यवहार किंवा गुंतवणूक करणे
मंगळवार शुभ असला तरी, या दिवशी गुंतवणूक (Investment) करणे किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जात नाही. यामुळे कार्यात प्रगती मिळत नाही आणि योजना अयशस्वी होऊ शकतात, तसेच धनहानीची भीती राहते. गुंतवणुकीसाठी बुधवारचा दिवस अधिक चांगला मानला जातो. मंगळवारी दान-पुण्य करावे.

५. काचेचे सामान खरेदी करणे किंवा भेट देणे
मंगळवारी काचेचे सामान खरेदी करू नये किंवा काचेची वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये. यामुळे धनहानी होते आणि अनावश्यक खर्च वाढू शकतो. या दिवशी लाल रंगाच्या वस्तू भेट देणे शुभ मानले जाते.

मंगळवारी कोणते उपाय केल्याने लाभ होतो?
सकाळी स्नानानंतर लाल किंवा नारंगी रंगाचे वस्त्र धारण करावे. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच नियमितपणे दर मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. सुख-शांती आणि समृद्धीसाठी गरजूंना दान करावे. हनुमानासमोर राईच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

















