मंगलाष्टकांऐवजी 'वंदे मातरम'च्या साक्षीनं विवाहसोहळा अन् HIV ग्रस्त बालकांना विशेष भेट, धनंजय मुंडेंचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:59 PM2021-02-23T17:59:05+5:302021-02-23T18:11:22+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या उपस्थितीत आज एक अनोखा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून धनंजय मुंडे देखील भारावले आणि त्यांनी सढळहस्ते मदतीची ग्वाही देखील या कार्यक्रमात दिली. जाणून घेऊयात या अनोख्या सोहळ्याची माहिती...

एचआयव्ही (HIV) बाधित परिवारातील अनाथ मुला-मुलींच्या दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राम येथे संपन्न झाला.

कोणत्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता नवरा-नवरींनी एकेमेकांना हार घालत वंदे मातरम या गीताचे गायन केले व विवाह संपन्न झाला! आपल्या आयुष्यात अनेक विवाहसोहळे आपण पाहिले, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले, परंतु या अनोख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले हे माझं भाग्यच असल्याचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील इंफन्ट इंडिया (आनंदग्राम) या एचआयव्ही ग्रस्त मुलांच्या संगोपन केंद्रास राष्ट्रीय महामार्गापासून जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपये मंजूर केले असून, पावसाळा सुरू होण्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

एचआयव्ही बाधित दाम्पत्याची पण पूर्णपणे सक्षम असलेल्या शिवकन्या या चिमुकलीचा पहिला वाढदिवस धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

धनंजय मुंडे यांनी शिवकन्येला केक भरवून तिचा वाढदिवस यावेळी साजरा केला.

धनंजय मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहून भारावून गेले होते.

संस्थेचे संचालक श्री. दत्ता बारगजे व सौ. संध्याताई बारगजे यांनी स्व. डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून एचआयव्ही बाधितांची सेवा करण्याचे, त्यांना सक्षम करून समाजात सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करण्याचे सेवाव्रत हाती घेतले आहे, हे अत्यंत महान कार्य असून, आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या शासकांकडून दुर्लक्षित राहणे हे अनाकलनीय व दुर्दैवी असल्याचेही मुंडे म्हणाले.

संस्थेच्या वतीने विवाह सोहळा व संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोविड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले दिसून आले.