जास्त मायलेज अन् पॉवरफुल इंजिन हवे? पाहा 150-200cc सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाइक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:21 IST2026-03-13T17:17:24+5:302026-03-13T17:21:23+5:30
मायलेज+पॉवरचा परफेक्ट कॉम्बो; 150-200cc सेगमेंटमधील टॉप 5 बाइक्स

भारत हे जगातील सर्वात मोठे टू-व्हिलर मार्केट आहे. 2025 मध्ये देशात 2 कोटींपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची विक्री झाली असून, ही मोठी वाढ मानली जाते. सध्या ग्राहक बाइक खरेदी करताना डिझाइन, आरामदायक राइड आणि नवीन तंत्रज्ञानला प्राधान्य देत असले तरी, मायलेज हा अजूनही सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. विशेषतः 150 ते 200 cc सेगमेंटमध्ये अशा अनेक बाइक्स आहेत, ज्या दमदार परफॉर्मन्ससोबत चांगले मायलेज देतात. अशाच काही लोकप्रिय बाइक्सबद्दल जाणून घेऊया.

TVS Apache RTR 160- ही या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाइक आहे. ही बाइक RTR 160 2V आणि RTR 160 4V या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यापैकी RTR 160 2V मॉडेल जास्त मायलेज देणारे मानले जाते. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाइक सुमारे 61 किमी प्रति लिटर मायलेज देते. स्पोर्टी लुक आणि हलके डिझाइन यामुळे ही बाइक तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

Bajaj Pulsar NS160- ही स्पोर्टी डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. या बाइकमध्ये 160.3cc ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 17.03 bhp पॉवर निर्माण करते. पॉवरफुल इंजिन असूनही ही बाइक सुमारे 52 किमी प्रति लिटर मायलेज देऊ शकते. शहरातील रस्ते तसेच हायवे राइडसाठी ही बाइक चांगला पर्याय मानली जाते.

Bajaj Pulsar N160- हीदेखील या सेगमेंटमधील लोकप्रिय बाइक आहे. कंपनीच्या माहितीनुसार ही बाइक सुमारे 51 किमी प्रति लिटर मायलेज देते. या बाइकमध्ये मॉडर्न डिझाइन, सुधारित ब्रेकिंग सिस्टम आणि अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाइक तरुणांमध्ये विशेष पसंतीस उतरते.

Yamaha R15 V4- ही आपल्या स्पोर्ट्स लुक आणि रेसिंग डिझाइनमुळे प्रसिद्ध आहे. या बाइकमध्ये स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे एक्सिलरेशनच्या वेळी इंजिनला अतिरिक्त मदत करते आणि इंधनाचा वापर कमी करण्यास मदत करते. ही बाइक सुमारे 50 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. स्पोर्ट्स बाइक आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.

Honda Unicorn- ही भारतात दीर्घकाळापासून विश्वासार्ह कम्यूटर बाइक म्हणून ओळखली जाते. या बाइकमध्ये 162.7cc इंजिन देण्यात आले असून ते स्मूद आणि आरामदायक राइडसाठी प्रसिद्ध आहे. ही बाइक सुमारे 50 किमी प्रति लिटर मायलेज देऊ शकते. दररोज लांब अंतर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही बाइक योग्य पर्याय मानली जाते.

















