Tata Tigor CNG Review: इम्प्रेस हो जाओगे? मांढरदेवीची चढण, टाटाची सीएनजी कार, त्यात गेल्या रविवारची गर्दी, दम काढला, पण...

By हेमंत बावकर | Published: February 13, 2023 06:00 PM2023-02-13T18:00:35+5:302023-02-13T18:10:15+5:30

कारची शोरुममध्ये टेस्ट राईड घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही या गोष्टी करून नाही पाहू शकणार... मांढरदेवीच्या डोंगराचा घाट.... बापरे, सीएनजी कार, दम नाही का निघणार...

सध्या सीएनजी कारच्या दुनियेत मारुतीच्या कारचाच दबदबा आहे. आता तर त्यांनी त्यांची सर्वात मोठी एसयुव्ही देखील सीएनजीवर काढली आहे. असे असताना टाटाने काही महिन्यांपूर्वी दोन कार सीएनजीवर आणल्या आहेत. आणखी दोन कार येणार आहेत. यापैकीच टाटा टिगॉर सीएनजी कार, टाटाने या दोन कारवर इम्प्रेस हो जाओगे? अशी टॅगलाईन दिली आहे. ती खरोखरच खरी आहे की नुसताच फुसका बार.... चला पाहुयात...

टाटा टिगॉर सीएनजी कार आम्ही जवळपास साडे तीनशे किमी वेगवेगळ्या कंडीशनमध्ये ती सुद्धा बहुतांश सीएनजीवर चालविली. यावेळी सीटी ट्रॅफिक, एक्स्प्रेस हायवे, पुणे-बंगळुरु हायवे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मांढरदेवीच्या डोंगराचा घाट.... बापरे, सीएनजी कार, दम नाही का निघणार... त्यातही कहर म्हणजे पौर्णिमेचा रविवार आणि खाली धावजी पाटलाची यात्रा... असा सारा मुहूर्तच. ही गर्दी ज्यांना माहितीय त्यांना कल्पना आली असणार...

असो, तर शहरात आम्ही ही कार सुरुवातीला पेट्रोलवर चालविली. सुमारे ५० किमी ही कार पेट्रोलवर चालविली. सिग्नलला चढण असताना तर कारमध्ये थोडा पंच कमी वाटला होता. यामुळे सीएनजीवर ही कार कशी परफॉर्म करेल, किती मायलेज देईल याची धाकधूक मनात होती.

टिगॉर असल्याने थोडीफार डीक्कीमध्ये स्पेस मिळाली. छोट्या छोट्या बॅगा यामध्ये बसू शकतात. आतमध्ये मात्र पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. अर्धा लीटरच्या बॉटल यात बसू शकतात. मागील दरवाजात देखील १ लीटरची जागा असली तरी त्या शेपची बाटली घेतलीतरच तिथे बसू शकते. यामुळे लांबच्या प्रवासाला निघताना पुरेसे पाणी सोबत नेता येणार नाही. म्हणजे कमी लगेज स्पेस हा एक या कारचा निगेटिव्ह पॉईंट आहे.

सस्पेंशनच्या बाबतीत या कारला कुठेच नाव ठेवायला जागा नाही. रस्त्यावरील खड्ड्यांचा आवाजही आतमध्ये जाणवत नाही. परंतू, सीएनजीवर असताना इंजिनचा आवाज छोडा बहुत जाणवतो. सस्पेंशन चांगले आहे. फोर स्टार सेफ्टी देखील या कारमधून मिळते. हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. ब्लुटूथ कनेक्टिव्हीटी असली तरी अँड्रॉईड ऑटो वापरण्य़ासाठी केबल कनेक्टिव्हीटी लागते. महत्वाचे म्हणजे त्यासाठी ही कार थांबवावी लागत नाही, तर कार चालत असताना देखील स्क्रीनवर जोडता येते. टाटाच्या नेक्सॉन, अल्ट्रूझमध्ये कार थांबवून अँड्रॉईड ऑटोसाठी कनेक्ट करावे लागते.

टाटा टिगॉरमध्ये दोन्ही वेळेला सात-सव्वा सात किलो सीएनजी भरण्यात आला. पुण्यातून मांढरदेवी, वाई, परत पुणे असा प्रवास झाला. हायवे आणि सीटीमध्ये सीएनजीवर पिकअपची समस्या जाणवली नाही. स्पीडब्रेकवर देखील ही कार सीएनजीवर आहे असे वाटले नाही, जे पेट्रोलवर कमी ताकदीचे वाटत होते ते देखील जाणवले नाही. डिझेलच्याच ताकदीची कार वाटत होती.

या कारची खरी परीक्षा मांढरदेवीच्या घाटात होती. वळणे वळणे, तीव्र चढण आदीवर कारने व्यवस्थित पिकअप दिला. कुठेही अंडर पावर अशी वाटली नाही. मांढरदेवीच्या डोंगरावर एन्ट्री फीसाठी मोठी रांग लागली होती. थोडी चढणच होती. तिथेही कारने बंपर टु बंपर असूनही चांगली ताकद दिली. कधी कधी हायवेवर ८०-१०० चा स्पीड गाठला ते देखील समजत नसायचे एवढा चांगला पिकअप मिळत होता, तो देखील सीएनजीवर.

त्याच्या पुढे मोठी कसोटी होती. मंदिराच्या पाथ्याखालीच एक मोठी चढण होती. त्यावर ट्रॅफिक थांबले होते. यावेळी सीएनजी कार मागे जाते की काय असे वाटत होते, परंतू, तिथेही कारने एवढा जबरदस्त पिकअप दिला की मनातली धाकधूक निघून गेली. आता मनात मायलेजची धाकधूक राहिली होती. ट्रॅफिक आणि गर्दी असल्याने दम निघाला होता, पण कारने काही दम निघू दिला नाही. एवढी पावर, खरेच सीएनजी कार इप्रेस करणारी होती.

तिथून निघाल्यानंतर मातीच्या खडबडीत रस्त्यावरही कार चालविली. तिथेही सस्पेंशन आणि पिकअपने निराश केले नाही. रात्रीच्या अंधारात गाडीची हेडलाईटही व्यवस्थित रस्त्यावर पडत होती.

अनेकदा काय होते, नवीन गाडी खरेदी करायला जातो तेव्हा दिवस असतो, यामुळे कारची ट्रायल घेताना लाईटचा फ्लो कसा आहे हे कळत नाही. त्यातच रात्रीच्यावेळी समोरून लाईट आली की आपल्या गाडीची लाईट दिसतच नाही, मग जास्ती वॅटचे बल्ब वापरून कटआऊट लावण्यासारखे प्रकार केले जातात. इथे तशी वेळ येणार नाही.

सिटी, स्पीडब्रेकर, एसी, रात्रीचा प्रवास, महत्वाचे म्हणजे मांढरदेवीचा घाट आणि ट्रॅफिक यामध्ये कारने मायलेजच्या बाबतीत निराश केले नाही. सीएनजी टाकीत ७.१५ किलो सीएनजी बसला, आधीचा थोडा किलोभर होता. आठ किलो सीएनजी पकडला तर कारने एवढ्या सगळ्या मिक्स कंडीशनमध्ये २०५ किमीचे अंतर गाठले. चढणीला, सिटीमध्ये कुठे कुठे पहिल्या ते तिसऱ्या गिअरमध्ये कार चालवावी लागत होती. यामुळे एवढे मायलेज देईल की नाही अशी शंका होती कारण पिकअपही जास्त होता. गाडीमध्ये चार जण होते.

कारने २५.६५ चे मायलेज दिले. १००-१२५ किमी हायवे असल्याने थोडा फायदा झाला, तर बाकीचा रस्ता हा तसा वळणावळणाचा, चढ-उतरणीचा होता. यामुळे तुमचा वापर कोणत्या भागात अधिक आहे, त्यावर तुम्हाला मायलेज मिळेल. कदाचित कमी, किंवा त्याहून जास्तीचेही मिळेल. आम्ही यासाठीच मिक्स कंडिशनमध्ये ही कार चालवून पाहिली. अन्य कंपन्यांच्या कारच्या तुलनेत ही कार मायलेज, पिकअपच्या बाबतीत सरस वाटली.

टॅग्स :टाटाTata