Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:45 PM2021-09-17T12:45:28+5:302021-09-17T12:50:44+5:30

Tata Motors आपली एक बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध क्षेत्रांत Tata भन्नाट कामगिरी करत आहे. Tata ग्रुपच्या अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्सही देत आहेत. यामध्ये Tata Motors चाही समावेश आहे.

अलीकडील काळात Tata Motors ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक तसेच अन्य सेगमेंटमध्ये उत्तमोत्तम कार सादर करत आहे. एवढेच नव्हे, तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा कार्सचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचं बजेट पूर्ण बिघडलंय. परिणामी अनेकांनी इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कमी खर्चातील गाड्यांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे.

पैशांची बचत होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची डिमांड वाढतेय. अशात अनेक कार कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून सीएनजी व्हर्जनमध्ये आपल्या कार आणत आहेत.

Tata Motors आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. काही डीलरशिप्समध्ये नवीन Tiago CNG साठी अनधिकृत बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात झाली आहे.

ग्राहक ५ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर निवडक टाटा डीलरशिप्समधून ही कार बूक करू शकतात. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG लाँच होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच Tata Motors ची नवीन Tiago CNG ही कार टेस्टिंग दरम्यानही स्पॉट झाली होती.

Tata Tiago CNG कारच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती लीक झाली होती. कंपनीने ही नवीन सीएनजी कार सध्याच्या टियागोपेक्षा वेगळी दिसावी यासाठी एकदम नवीन बंपर, क्रोमसह नवीन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डीआरएल, आकर्षक एलईडी टेल लाइट्स असे फीचर्स दिले आहेत.

याशिवाय अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होणारी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायपरसह रिअर डिफॉगर असे फीचर्सही या कारमध्ये मिळतील. Tata Tiago CNG १.२ लिटर रेवोट्रॉन इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

मार्केटमध्ये सध्या विक्री होत असलेली टियागो ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार असल्याचा कंपनी दावा करते. त्यानुसार टियागो सीएनजी देखील सुरक्षेच्या बाबतीत दमदार असेल. मार्केटमध्ये सध्या विक्री होणाऱ्या Tata Tiago कारला NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या कारला ४ स्टार रेटिंग मिळाली आहे.

या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल असे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या बाबतीत टाटाची ही छोटी आणि स्वस्त कार जबरदस्त आहे.

Tata Tiago CNG मध्ये हे सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील. या कारच्या किंमतीबाबत कंपनीने अजून काही घोषणा केलेली नाही, पण मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या टियागोपेक्षा सीएनजी व्हर्जनची किंमत किमान १ लाखापर्यंत जास्त असण्याची शक्यता आहे.

सध्याच्या टियागोची बेसिक एक्स शोरुम किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिअंटची किंमत ७.०५ लाखापर्यंत जाते. लाँच झाल्यानंतर या कारची मारुती वॅगनआर सीएनजी, मारुती सिलेरियो सीएनजी, ह्युंडाई आय-१० सीएनजी अशा शानदार कारसोबत टक्कर असेल.