'या' Electric Bike चा जबरदस्त धमाका; २ तासांत ५० कोटी किंमतीच्या बाईक्सची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 03:08 PM2021-06-20T15:08:08+5:302021-06-20T15:14:10+5:30

Electric Bike In India : या बाईकला मिळतोय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद. जबरदस्त रेंज आणि अनेक सुविधांसह मिळतेय इलेक्ट्रीक बाईक. सरकारकडूनही मिळतंय अनुदान.

स्टायलिश डिझाईन आणि जबरदस्त रेंज असलेल्या Revolt RV400 या Electric Vehicle ला ग्राहकांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कंपनीनं शुक्रवारी आपल्या www.revoltmotors.com या वेबसाईटवर या बाईकचं बुकिंग पुन्हा सुरू केलं होतं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन तासांमध्ये या बाईकच्या सर्व युनिट्सची विक्री झाली आणि बुकिंग पुन्हा बंद करावं लागलं.

या सेलमध्ये 50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली. दरम्यान, लवकरच पुन्हा बुकिंग सुरू केलं जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आहे. ज्या ग्राहकांना आता बाईक बुक केली आहे, त्यांना सप्टेंबर महिन्यात गाडीची डिलिव्हरी मिळेल.

काही दिवसांपूर्वीच सरकारनं FAME II या स्कीमअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली होती. त्यानंतर Revolt RV400 या बाईकची किंमत मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली होती.

कंपनीनं Revolt RV400 या बाईकच्या किंमतीत 28 हजारांपर्यंतची कपात केली होती. किंमतीत कपात केल्यानंतर या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 90,799 रूपये झाली आहे. यापूर्वी या बाईकची किंमत 1.19 लाख रूपये एक्स शोरूम इतकी होती.

Revolt RV400 या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3KW मोटर आणि 3.24KWh लिथिअम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या बाईकचा टॉप स्पीड हा 85 किमी प्रति तास इतका आहे. या बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेचार तासांचा कालावधी लागत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

Revolt RV400 ही बाईक तीन रायडींग मोड्समध्ये येते. यामध्ये Eco, Normal, Sports हे तीन मोड देण्यात आले आहे. इको मोडमध्ये पूर्ण चार्ज असल्यास बाईक 150 किमी पर्यंत जाऊ शकते. ही बाईक ब्लॅक आणि रेड या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Revolt RV400 ही बाईक अॅपद्वारे ऑपरेट केली जाऊ शकते. तसंच यामध्ये बाईक लोकेटर, जिओ फेन्सिंगसारखे कनेक्टिव्हीटी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये कस्टमाईज साऊंडचीही सुविधा देण्यात आली आहे.

चालकाला स्क्रीनवर टॅप करून एक्झॉस्ट साऊंड सिलेक्ट करता येऊ शकतो. याशिवाय बाईक डायग्नोस्टीक, बॅटरी स्टेटस आणि तुमची राईड हिस्ट्री, किलोमीटरही पाहण्याची सुविधा यामध्ये आहे.

याशिवाय तुम्हाला या बाईकसोबत बॅटरी स्विचींगचाही ऑप्शन मिळतो. तुमची डिस्चार्ज झालेली बॅटरी देऊन तुम्ही पूर्ण चार्ज असलेली एखादी बॅटरी घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला रिवॉल्ट स्विच स्टेशनची माहिती घेता येऊ शकते.