प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:04 IST2025-11-01T15:57:41+5:302025-11-01T16:04:10+5:30
भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या जगात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या जगात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही 'ई-विटारा' डिसेंबर २०२५ मध्ये शोरूममध्ये दाखल होणार आहे. ही गाडी २०२३ च्या ऑटो एक्सपोमध्ये दाखवलेल्या 'eVX कॉन्सेप्ट'चे उत्पादन मॉडेल आहे.

मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही विभागात मारुतीची ही नवी 'ई-विटारा' महिंद्रा BE 6, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, एमजी ZS EV आणि टाटा कर्व EV अशा गाड्यांशी थेट स्पर्धा करेल. मारुती सुझुकी या 'ई-विटारा'चे उत्पादन गुजरातमध्ये असलेल्या हंसलपूर येथील प्लांटमध्ये करणार आहे.

कंपनीने या एसयूव्हीची निर्यात जर्मनी, ब्रिटन, नॉर्वे आणि फ्रान्ससह १२ युरोपियन देशांना सुरु केली आहे. लवकरच १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात वाढवण्याचे मारुतीचे लक्ष्य आहे. 'ई-विटारा' मध्ये ग्राहकांना ४९kWh आणि ६१kWh असे दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळतील. ४९kWh बॅटरीसोबत १४४ हॉर्सपॉवरची मोटर असेल.

६१kWh बॅटरी दोन प्रकारांत उपलब्ध असेल. ज्यात, टू-व्हील ड्राइव्ह १७४ हॉर्सपॉवर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह १८४ हॉर्सपॉवर. या मॉडेलमध्ये अधिक पॉवरसाठी मागील एक्सलवर एक वेगळी मोटर जोडली आहे.

मारुति सुझुकीने स्पष्ट केले आहे की, भारतीय ग्राहकांसाठी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ५०० किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देईल. म्हणजेच, एका चार्जमध्ये तुम्ही लांबचा प्रवास करू शकाल.

'ई-विटारा'चा आतील भाग मारुतीच्या सध्याच्या गाड्यांपेक्षा खूपच जास्त प्रीमियम आणि आधुनिक असेल. यात एक माहिती आणि मनोरंजनासाठी आणि दुसरी स्पीडोमीटरसाठी अशा दोन मोठ्या स्क्रीन्स असतील. ग्लॉस ब्लॅक फिनिश असलेला फ्लोटिंग सेंटर कन्सोल आणि ट्विन-स्पोक स्टिअरिंग व्हील दिसेल.

महत्त्वाची वैशिष्ट्ये : ADAS (सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी विशेष तंत्रज्ञान), वायरलेस फोन चार्जर आणि युएसबी पोर्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, १८-इंचचे अलॉय व्हील्स. मारुतीची ही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. या कारची किंमत २० ते २० लाखांच्या दरम्यान असणार आहे.

















