TATA ला टक्कर देण्यास मारुती सज्ज! लवकरच मायक्रो एसयूव्ही आणणार; थेट Punch शी स्पर्धा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:16 PM2021-11-29T17:16:57+5:302021-11-29T17:21:22+5:30

आता Maruti Suzuki ने Tata Punch ला टक्कर देण्यासाठी याच सेगमेंटमध्ये मायक्रो एसयूव्ही सादर करण्याचे ठरवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून TATA च्या कार भारतीय बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय होत असून, टाटा मोटर्सच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली आहे. विक्रीच्या बाबतीत टाटा आता मारुती सुझुकीच्या जवळ पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच टाटा मोटर्सने Tata Punch बाजारात सादर करून धमाल उडवून दिली आहे. ही कार अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली असून, विक्रीच्या बाबतीत टॉप १० कारमध्ये समाविष्ट झाली आहे. यामुळे आता Maruti Suzuki ने याच सेगमेंटमध्ये मायक्रो एसयूव्ही सादर करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

अलीकडेच मारुती सुझुकीने नव्या जनरेशनमधील सेलेरियो कार लॉन्च केली आहे. याव्यतिरिक्त कंपनी लवकरच स्विफ्ट, बलेनो, ब्रिझा आणि एस-क्रॉस यांसारख्या आपल्या लोकप्रिय कार्स पुन्हा एकदा नव्याने लॉन्च करणार आहे.

Bestcarweb ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुझुकी एका मायक्रो एसयूव्हीवर काम करत असून, ती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकवर आधारीत असण्याची शक्यता आहे. हे नवे मॉडेल सुझुकी स्विफ्ट क्रॉस नावाने लॉन्च केले जाऊ शकते.

यासाठी आणखी अवधी लागणार आहे. जागतिक पातळीवर २०२४ च्या शेवटापर्यंत मायक्रो एसयूव्ही सादर करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुझुकी स्विफ्ट क्रॉस (Suzuki Swift Cross) ची टाटा पंच (Tata Punch) सारख्या गाड्यांशी स्पर्धा असेल.

टाटा पंच गेल्याच महिन्यात लॉन्च करण्यात आली. मारुती सुझुकीकडे या सेगमेंटमध्ये याआधीपासूनच इग्निस (Ignis) कार आहे. याव्यतिरिक्त कंपनी Suzuki Swift Cross भारतात टाटा पंचला टक्कर देण्यासाठी आणू शकते, असेही काही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.

सुझुकीचा लेटेस्ट हार्टेक्ट प्लेटफॉर्म आगामी स्विफ्ट क्रॉसमध्ये पाहायला मिळू शकतो. कारमध्ये टर्बोचार्ज्ड १.४ लीटर इंजिन मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, इग्निस आणि सबकॉम्पॅक्ट एसयूवी विटारा ब्रिजा यांच्यासोबतच स्विफ्ट क्रॉस तयार करण्यामागे ग्राहकांना कंपनी आणखी एक पर्याय उपलब्ध करुन देण्याची सुझुकीची योजना आहे.

तसेच इतर अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सुझुकी वैश्विक बाजारांमध्ये उपलब्ध टोयोटा यारिस क्रॉसला स्विफ्ट क्रॉसच्या रुपात रिबॅज करु शकतात.