Honda ने लॉन्च केली नवीन Honda CB350; रॉयल एनफिल्ड Classic 350 शी थेट स्पर्धा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 06:45 PM2023-11-17T18:45:08+5:302023-11-17T18:48:49+5:30

Honda ने रेट्रो-क्लॉसिक लुकमध्ये नवीन CB350 लॉन्च केली आहे.

Honda CB350 Price and Features: आघाडीची टू-व्हिलर कंपनी Honda मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने पुन्हा एकदा 350 सीसी सेगमेंटला टार्गेट केले आहे. Honda ने आज आपली नवीन Honda CB 350 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Honda ने या बाईकला नाव पूर्वीसारखे 'CB350' दिले आहे.

भारतीय बाजारपेठेतील प्रत्येक टू-व्हिलर उत्पादकाची नजर 350 सीसी सेगमेंटवर आहे. सध्या या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे आणि एकट्या रॉयल एनफिल्डने 80 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. Honda आपल्या नवीन Honda CB 350 सह पुन्हा एकदा या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या बाईकचे एकूण दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत.

बेस मॉडेल Honda CB 350 Deluxe ची किंमत 1,99,900 रुपये आणि Deluxe Pro मॉडेलची किंमत 2,17,800 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. होंडाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी किमतीत ही बाईक बाजारात आणली आहे. ग्राहक कंपनीच्या BigWing डीलरशिपद्वारे ही बाईक बुक करू शकतील.

कंपनीने ऑल न्यू CB350 सेगमेंटला विशेष रेट्रो-मॉडर्न लुक दिला आहे. यात मस्क्यूलर फ्युएल टँक, स्टायलिश ऑल-एलईडी लायटिंग सिस्टम, गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प आहेत. रेट्रो क्लासिक लुकसोबतच ही बाईक एकूण 5 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन कलरचा समावेश आहे.

कंपनीने Honda CB 350 मध्ये 348.36 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 5500 RPM वर 20.8 bhp ची कमाल पॉवर आणि 3000 RPM वर 29.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 5-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लच देखील देण्यात आला आहे. कंपनीने बाईकच्या एक्झॉस्ट नोटला (सायलेन्सरचा आवाज) अधिक चांगला आवाज देण्याचा प्रयत्न केला आहे.

कंपनीने टॉप-स्पेक डीएलएक्स प्रो व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ सपोर्टसह होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम (HSVCS), होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, ड्युअल-चॅनल ABS, यासह अनेक फीचर्स दिले आहेत. 18-इंच व्हील एलईडी लायटिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, डबल लेयर एक्झॉस्ट आदींमुळे ही बाईक आणखी आकर्षक बनते.

या Honda बाईकची थेट स्पर्धा सेगमेंट लीडर रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 शी आहे. आता ही बाईक रॉयल एनफिल्डला कितपत टक्कर देऊ शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची भारतीय बाजारपेठेत सुरुवातीची किंमत 1.93 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटसाठी 2.25 लाख रुपयांपर्यंत जाते. दोन्ही बाईकच्या इंजिनचे पॉवर आउटपुट जवळपास समान आहे.