पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...

By हेमंत बावकर | Updated: April 28, 2025 13:01 IST2025-04-28T12:44:20+5:302025-04-28T13:01:08+5:30

Citroen EC3 EV Marathi Review: कारने आम्हाला पनवेलच्या दिशेने जाताना २३० ची रेंज दाखविली. लोणावळ्यापर्यंत गेल्यावर २५ टक्के चार्जिंग संपलेले होते...

तुमची पुढची कार कोणती असेल? पेट्रोल, सीएनजी की ईलेक्ट्रीक? शहरात फिरत असाल किंवा बाहेर जात असाल तर ईलेक्ट्रीक कार सोईची नाही, असा सध्याचा समज आहे. यामुळे अनेक लोक सीएनजी, पेट्रोलच्या कार घेत आहेत. परंतू, सध्या ईव्ही चार्जर एवढ्या प्रमाणावर झाले आहेत की तशी गैरसोय होण्याची शक्यता फार कमी आहे. असे आम्ही का म्हणतोय कारण आम्ही पुणे-कर्जत-पनवेल ते पुन्हा पुणे असा इलेक्ट्रीक कारने प्रवास केला आहे.

थोडीशी धाकधूक मनात होती. कारण जिथे आम्ही जाणार होतो तिथे होम चार्जिंगची सोय नव्हती, तसेच आम्हाला त्याच दिवशी माघारी यायचे होते. सिट्रॉईन सी ३ ची पेट्रोल कार आम्ही चालविली होती, तिचे हे ईलेक्ट्रीक व्हर्जन होते. सिट्रॉईन ईसी ३ ईव्ही आम्ही २७४ किमी चालविली. यापैकी २३२ किमी अंतर आम्ही एका दिवसात पार केले होते. या प्रवासात आम्हाला ही कार कशी वाटली पाहुयात...

तशी सिट्रॉएनची ही कार पाचजण आरामात प्रवास करू शकतील एवढी ऐसपैस आहे. मागे बूटस्पेसही चांगली आहे. म्हणजे चार दिवसांचे चार-पाच जणांच्या बॅगा घेऊन जाता येईल एवढी. पुढच्या, मागच्या डोअरमध्ये १ लीटर पाण्याच्या बॉटल ठेवता येतील. गिअर कंसोलजवळ मोठी पाण्य़ाची बॉटल ठेवता येईल. कारण उन्हाळ्याच्या दिवसात लाँग रूटवर असाल तर तेवढे पाणी ठेवणे गरजेचे आहे. मागच्या बाजुला एसी व्हेंट नसला तरी पाठीमागे एसीचा पुरेसा फ्लो होतो, त्यामुळे गरम होत नाही.

कारचा सिंपल सोबर लुक आहे, व्हीलबेस मोठा आहे यामुळे ही कार एखाद्या मोठ्या कारसारखी वाटते. ड्युअल टोनमध्ये आणखी आकर्षक वाटते. मिनी एसयुव्ही जरी असली तरी आतमध्ये प्रशस्त जागा देण्यात कंपनीने कुठेही काटकसर केलेली नाही. ईलेक्ट्रीक असल्याने या कारमध्ये पेट्रोलपेक्षा जास्त पावर आहे. घरी चार्ज करताना जवळपास ११ तास लागतात. तर फास्ट चार्जरवर त्या चार्जरच्या प्रकारानुसार एक ते दीड तास लागू शकतो.

या कारने आम्हाला पनवेलच्या दिशेने जाताना २३० ची रेंज दाखविली. लोणावळ्यापर्यंत गेल्यावर २५ टक्के चार्जिंग संपलेले होते, पुढे कर्जतला थांबायचे होते. तिथे गेल्यावरही उतार असल्याने कारने ४० डिग्री तापमानातही एसी चालू असताना ७५ टक्केच चार्जिंग शिल्लक असल्याचे दाखविले. उताराला रिजेन मोडमुळे बऱ्यापैकी बॅटरी चार्ज झाली होती. याचा फायदा पुढे पनवेलला जाण्यासाठी झाला. पनवेलला जुन्या हायवेवरून जाईपर्यंत कारने आणखी १५ टक्के चार्जिंग संपविले होते.

म्हणजेच परत घाट, घाटातील वाहतूक कोंडी पार करून पुण्यात येण्यासाठी आमच्याकडे ६० टक्के चार्जिंग शिल्लक होते. पनवेलमध्ये बाजारातून १० एक किमी गाडी चालविल्यावर कारने ५५ टक्के चार्जिंग दाखविले. येण्यासाठी पुरेशी रेंज दाखवत असली तरी रिस्क नको म्हणून आम्ही पनवेलमध्येच कार थोडी चार्ज करण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के चार्ज करून आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. या प्रवासात कारने जवळजवळ ५० टक्के बॅटरी वापरली होती. जर चार्ज केले नसते तर जिवाची घालमेल करत आम्हाला प्रवास करावा लागला असता, किंवा लोणावळ्यात येऊन आम्हाला कार चार्ज करावी लागली असती.

या प्रवासाचा हिशेब घातल्यावर आम्हाला कारने जेवढी सुरुवातीला दाखविलेली २३० त्याच्या आसपासच रेंज दिली. एक टक्क्यामागे साधारण २.२ किमी अशी या कारची रेंज आहे. शहरात चालविताना देखील तेवढीच बॅटरी वापरली जाते. आम्ही पुण्याच्या वाहतुकीतही जवळपास ४० किमी कार चालविली होती. यावेळीही कारने २० टक्के बॅटरी वापरली होती. यामुळे एक आश्वासक रेंज देणारी कार आहे, असे आम्हाला आढळले. तुम्ही त्यानुसार तुमची ट्रीप प्लॅन करू शकता. महत्वाचे म्हणजे, या कारमध्ये दोन वयस्क आणि एक लहान मुल असे तिघेजण प्रवास करत होते. दुपारचे कडाक्याचे तापमान होते, त्यामुळे एसीदेखील २१ वर ठेवला होता. चढ-उतार आणि वेग हे तुमच्या खऱ्या रेंजवर परिणाम करतात. यामुळे त्यानुसार कोणत्याही ईव्हीसोबत ट्रिप प्लॅन करणे गरजेचे आहे.

२५ टक्के कार चार्ज करण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला. शेलच्या चार्जरवर आम्ही ही कार चार्ज केली. त्यापेक्षा फास्ट चार्जर असेल तर तुम्हाला वेगळा अनुभव येईल. एक्स्प्रेस हायवेवर ही कार थोडी आम्हाला बाऊंसी वाटली, सस्पेंशन बॅटरीच्या वजनानुसार ट्यून केलेले असल्याने असे वाटत होते. पुण्यातील प्रचंड पॅचवर्क असलेल्या रस्त्यावरही कार बाऊंसी फिल देत होती. यामुळे थोडा कंफर्ट कमी झाला होता.

सिट्रॉएन ईसी३ मध्ये 26 cm ची वायरलेस टचस्क्रीन उत्तमरित्या काम करत होती, नेव्हीगेशन सेट करायचे असेल किंवा गाणी लावायची असतील तरी टच सेन्स चांगला असल्याने काही अडचण येत नव्हती. साऊंड क्वालिटी देखील चांगली होती. खड्ड्यांमधून चाके गेली तरी कार फक्त बाऊंस होत असल्याने कळत होते, आवाज काही आत येत नव्हता. आधीच सायलेंट कार असली तरीही रोड नॉईसही आत येत नव्हता. पिकअप चांगला असल्याने आम्हाला घाटात चढणीला थांबलेले असताना कुठेही गाडी उठविण्याची भीती जाणवली नाही, तसेच ओव्हरटेक करताना देखील विश्वास गमावला नाही.

एसी चांगल्या प्रकारे काम करत होता. कमी फंक्शन आणि विश्वासार्ह रेंज, यामुळे ही कार उजवी ठरते. तसेच या कारमध्ये चांगली बुटस्पेस देण्यात आली आहे, यामुळे लांबच्या प्रवासाला देखील ही कार चांगली ठरते. रात्रीच्या वेळी कारची लाईट योग्य प्रकारे रस्त्यावर पडते, महत्वाचे म्हणजे एलईडी व्हाईट लाईट नाही, तर यलो लाईट थ्रो असल्याने पावसात, धुक्याच्या दिवसात, हिवाळ्यात ही कार खूपच चांगली आहे. आताच्या कारच्या एलईडी लाईटमुळे या दिवसात रस्त्यावरचे काही दिसत नाही. अजून सिट्रॉईनने यलो लाईट सोडलेली नाही, यामुळे रात्रीच्या प्रवासावेळी ही कार सर्वात सुरक्षित ठरते.