सात सीटर पेट्रोल एसयुव्ही, ताम्हीणी घाट...! थक्क करणारी डिझेलसारखी पावर, फिरुन आली अख्खा हरिहरेश्वरपर्यंतचा वावर...
By हेमंत बावकर | Updated: January 21, 2026 16:28 IST2026-01-21T16:16:46+5:302026-01-21T16:28:53+5:30
Citroen C3 Aircross Marathi Review: पेट्रोलमध्ये डिझेलसारखी पॉवर! सिट्रॉन सी ३ एअरक्रॉसने पुणे ते हरिहरेश्वर प्रवासात सर्वांना थक्क केले. ७-सीटर एसयुव्हीचा सविस्तर रिव्ह्यू आणि मायलेज टेस्ट.

- हेमंत बावकर
"पेट्रोल कारमध्ये ताकद नसते, त्यात ७-सीटर असेल तर विचारूच नका," हा समज मोडीत काढणारी एक कार सध्या चर्चेत आहे. फ्रेंच बनावटीची सिट्रॉन सी ३ एअरक्रॉस (Citroën C3 Aircross) घेऊन आम्ही पुणे-ताम्हिणी घाट-श्रीवर्धन ते हरिहरेश्वर असा प्रवास केला. नागमोडी वळणे, चढ-उतार आणि खराब रस्त्यांवर या कारने दिलेली 'डिझेलसारखी पॉवर' थक्क करणारी आहे. नागमोडी वळणांचा, वर्दळ असलेला हा घाटरस्ता ओव्हरटेक करताना आणि वेग पकडताना तसा कसरतीचा होता. या एसयुव्हीने आम्हाला प्रवास करताना, चालविताना कसे वाटले... चला पाहुया...

मुळात सिट्रॉएन ही एक फ्रेंच कंपनी. तुम्हाला जीप माहित आहे का, हा... त्याच ग्रुपची. ही कंपनी दमदार सस्पेंशनसाठी आणि पावरसाठी ओळखली जाते. भारतीय रस्त्यांवर आपल्याला दोन्ही गोष्टींची गरज एकाचवेळी लागते. कारण रस्ते आणि भौगोलिक परिस्थीती. आम्ही सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास पुण्यातून श्रीवर्धनला जाण्याचा निर्णय घेतला होता. थोडी धाकधुक होती, वळणावळणाचा रस्ता, शनिवारची सायंकाळ असल्याने या रस्त्यावर ट्रॅफिक तर असणार. मायलेज किती देईल? मध्येच बंद पडली तर, रात्रीच्या अंधारातून जाणे सेफ असेल का असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवत होते. आम्ही या कारने ४०० किमीचा प्रवास केला.

औंध, हिंजवडीचा ट्रॅफिकचा पट्टा पार करण्यातच सहा वाजले होते. गुगल मॅपवर ९.४० वाजता पोहोचण्याचे दिसत होते. ताम्हिणी घाटातून जायचे आणि पुढे पुन्हा जंगलभागातून जाणारा नागमोडी रस्ता. आमच्याकडे असलेली citroen c3 aircross x ही कार ६ स्पीड टॉर्क कन्हर्टर ऑटोमॅटीक व्हेरिअंट होती. यामुळे चढ उतार, पिकअप, वळणावळणांचा चालविताना काहीच त्रास जाणवला नाही. खड्ड्यांचा रस्ता मध्ये मध्ये होता. परंतू कुठेही आम्हाला आतमध्ये खड्डा जाणवला नाही. ३०-४० च्या वेगानंतर सस्पेंशन एवढे स्मूथ होते की सिमेंटच्या रस्त्यावरील खडबडही जाणवत नाही. हा शहरात चालविताना कमी वेग असतो तेव्हा ती थोडी जास्त हलते डुलते. एकदा का प्रवासाला लागली की मग काहीच त्रास जाणवत नाही.

इंजिनचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की आम्हाला कुठेही चढणीला या एसयुव्हीने कच खाल्ली असे वाटले नाही. ११९९ सीसीचे इंजिन असूनही १४९९ सीसीच्या डिझेल इंजिनसारखी जबरदस्त ताकद मिळत होती. वाटेत मिळत असलेल्या काही सात सीटर कारसोबतही आम्ही स्पर्धा लावून पाहिली. या एमपीव्ही चढणीला जीव टाकत होत्या. परंतू, एअरक्रॉस त्यांना झटपट क्रॉस करत पुढे जात होती. डिझेलसारखी पावर या कारमध्ये मिळत होती.

पुढच्या सीट व्हेंटिलेटेड आणि मधल्या रोमधील सीट या तीन टप्प्यात रिक्लायनिंग असल्याने आतमध्ये बसल्यावर चांगला कंफर्ट मिळत होता. सात सीटर कारमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे बुटस्पेसची. या कारमध्ये तिसऱ्या रोच्या सीट फोल्ड करता येतात आणि काढूनही ठेवता येतात. यामुळे तुम्ही मोठ्या लगेज स्पेसचा वापर करू शकता. एवढा की आठवडा भराचे साहित्य तुम्ही सोबत नेऊ शकता. गावी जाण्यासाठी लांबच्या पल्ल्यासाठी ही कार एक चांगला पर्याय ठरते.

वळणावर कार कुठेही अनकंट्रोल वाटत नव्हती की आतमध्ये जाणवत होते. आपण जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घेतो तेव्हा लाईट थ्रोची टेस्ट घेता येत नाही. नंतर घेतल्यावर रस्त्यावर नीट दिसत नसल्याची अनेकांची तक्रार असते. आम्ही रात्रीची देखील कार चालविल्याने याचा अनुभव शेअर करत आहोत. रात्रीचा लाईटचा अपर आणि डिपरचा थ्रो एकदम रस्त्यावर आहे. जेणेकरून चांगली व्हिजिबिलीटी मिळते. केबिनमध्ये डॅशबोर्ड ते दरवाजांवर अँबिअंट लायटिंग दिलेली आहे. त्याचा डोळ्यांना त्रास होत नाही. ती चालू बंद देखील करता येते. ज्यांना नको ते कायमची बंद करू शकतात.

साऊंड सिस्टीमचा आवाज चांगला आहे. मागील सीटसाठी ड्रायव्हरच्या डोक्याच्या थोडे मागील बाजुला एसी व्हेंट दिलेला आहे. सध्या हिवाळा असल्याने आम्हाला एसीची फारशी गरज लागली नाही, परंतू दुपारी १२ च्या सुमारास समुद्राच्या भागातील उन असल्याने वापरून पाहिला. कुलिंग चांगले आहे. टचस्क्रीनचा रिस्पॉन्स चांगला आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील चांगला आकर्षक 17.78 cm डिजिटल कलर असलेला देण्यात आला आहे. त्यावरील मायलेज, स्पीड आदीची माहिती ठसठशीत दिसते.

स्टिअरिंगवर कंट्रोल देण्यात आले आहेत. आवाज कमी जास्त करणे, क्रूझ कंट्रोल, मेनू आदी गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतात. रस्ता वळणावळणाचा असल्याने आम्ही क्रूझ कंट्रोल वापरू शकलो नाही. कोकणात याचा फारसा वापर नसला तरी हायवेवर क्रूझ कंट्रोल खूप उपयुक्त असतो. या एसयुव्हीमध्ये ४५ लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. आम्ही चालविलेल्या रोड कंडिशनला या कारने आम्हाला १४ चे मायलेज दिले. हायवे असेल तर ही कार १६-१७ च्या वरचे मायलेज देईल. मॅन्युअल कार आरामात १८-१९ पर्यंतचे मायलेज देऊ शकते. या गोष्टी रोड कंडिशन, आतील लोड आणि चालविणाऱ्याच्या सवयींवर अवलंबून असतात.

काही उणिवा आणि सुधारणा
इतकी दमदार असूनही काही गोष्टींत सुधारणेला वाव आहे. कारचे डोअर हँडल जुन्या स्टाईलचे वाटतात. तसेच, डॅशबोर्डवर काही ठिकाणी वापरलेल्या प्लास्टिकची क्वालिटी आणखी चांगली असायला हवी होती. डॅशबोर्डवर लेदर असले तरी थोडी प्लॅस्टिक क्वालिटी चांगली वापरायला हवी, दिसायला लुक चांगला आहे, युरोपियन कारचा फिल देणारा. लोकांच्या डोळ्यात बसण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. पाच-सात जणांच्या फॅमिलीसाठी ही कार एक चांगला पर्याय आहे. किंमत स्पर्धात्मक आहे, सात सीटर कार 8.29 लाख एक्स शोरुमपासून सुरु होते.

















