कारमध्ये बुलेट ट्रेनची टेक्निक वापरली; टायर कधीच झिजणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:52 PM2022-09-22T17:52:35+5:302022-09-22T17:56:37+5:30

सध्या उडत्या कारच्या बातम्याच येत आहेत. बुलेट ट्रेनदेखील परदेशातच आहेत, आपल्याकडे भारतात कधी सुरु होईल, याची अद्याप प्रतिक्षाच आहे.

उडणाऱ्या गाडीविषयी आज अनेकांना कुतूहल आहे. सध्या या उडत्या कारच्या बातम्याच येत आहेत. बुलेट ट्रेनदेखील परदेशातच आहेत, आपल्याकडे भारतात कधी सुरु होईल, याची अद्याप प्रतिक्षाच आहे. असे असले तरी शास्त्रज्ञांनी बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान कारमध्ये वापरून त्याचा व्हिडीओ जारी केला आहे.

चीनच्या सियुआन प्रांतात चेंगदूमध्ये जियाओतोंग विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी गेल्याच आठवड्यात या कारचे रस्त्यावर परिक्षण केले आहे. ही कार मॅग्नेटच्या साह्याने रस्त्यापासून ३५ मिलीमीटर वरून तरंगत चालते. यासाठी बुलेट ट्रेनमध्ये वापरतात ते कंडक्टर रेल मॅग्नेट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ही कार टायर फक्त थांबण्यासाठीच वापरते.

या कारमध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी संशोधकांनी आठ सेदान कारमध्ये ताकदवर मॅग्नेट बसविले होते. ही मॅग्नेट कारच्या चाकांच्या बाजुला बसविण्यात आली होती. या कारचे ८ किमी रेल ट्रॅकवर टेस्टिंग करण्यात आले. या आठपैकी एका कारचा वेग तब्बल २३० किमी प्रति तासांवर पोहोचला होता.

वाहनांच्या टेस्टिंगचा हा व्हिडीओ चिनी पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कार काही काळ हवेत तरंगत असतानाही दिसत आहेत. हाय स्पीड ड्रायव्हिंगवरील सुरक्षा उपायांवर संशोधन केले जात आहे. याचाच हा प्रयोग एक भाग असल्याचे चीनच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. प्राध्यापक देंग जिगांग यांनी म्हटले की, प्रवासी कारमध्ये हे तंत्रज्ञान वापरले तर इंधन वाचेलच परंतू, जास्त ड्रायव्हिंग रेंज देखील मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक वाहनांच्या रेंजच्या चिंतेला कमी करण्यात मदत करू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक वाहन उद्योगात रेंजची चिंता ही एक समस्या आहे. वाहनाची बॅटरी संपण्याची सततची चिंता वाहन मालकांना असते. आपला प्रवास पूर्ण होण्यापूर्वीच बॅटरी संपेल की काय अशी भिती या लोकांना वाटत असते.

1980 च्या दशकापासून, काही व्यावसायिक गाड्यांमध्ये चुंबकीय उत्सर्जन किंवा "मॅगलेव्ह" चा वापर केला जात आहे. यामध्ये उच्च वेगाने वस्तू पुढे नेण्यासाठी किंवा खेचण्यासाठी विद्युत चुंबकीय क्षेत्र वापरले जाते. दक्षिण कोरिया, चीन आणि जपानमध्ये मॅग्लेव्ह ट्रेनचा वापर केला जातो. हेच तंत्रज्ञान जर वाहनांमध्ये आले तर फायदा होईलच परंतू त्यासाठी रस्ते मॅग्नेटिक स्ट्रीपचे बनवावे लागणार आहेत. जे भारतात तरी शक्य नाहीय.