15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार ब्रिटिश ब्रँडची दमदार बाईक; Royal Enfield शी थेट स्पर्धा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 09:54 PM2024-06-24T21:54:45+5:302024-06-24T22:05:39+5:30

BSA Gold Star 650 Launch Date : महिंद्रा ग्रुपची सहाय्यक कंपनी क्लासिक लीजेंड्स भारतीय बाजारपेठेत येण्यास सज्ज झाली आहे.

British Brand Bike in India : महिंद्रा ग्रुपची सहाय्यक कंपनी क्लासिक लीजेंड्स (Classic Legends) भारतीय बाजारपेठेत BSA ब्रँड परत आणण्याच्या तयारीत आहे. बीएसए गोल्ड स्टार 650 (BSA Gold Star 650) यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने या बाईकचा एक नवीन टीझरदेखील शेअर केला आहे. या टीझरमध्ये ब्रिटीश ब्रँडने भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली बाईक लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

ब्रिटीश ब्रँड Classic Legends ने BSA Gold Star 650 चा टीझर शेअर केला आहे. यामध्ये कंपनीने सांगितले की, तुमच्या कॅलेंडरमध्ये 15 ऑगस्टची तारीख मार्क करुन ठेवा. क्लासिक लीजेंड्स काहीतरी मोठे, बोल्ड आणि ऑथेंटिकली ब्रिटिश ब्रँड घेऊन येत आहे. जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल उत्पादक कंपनीत सामील होण्यासाठी सज्ज व्हा.

Royal Enfield Interceptor 650, BSA Gold Star 650 शी कडवी स्पर्धा करू शकते. BSA Gold Star 650 ला क्लासिक लुक देण्यासाठी मोठ्याप्रमाणात क्रोम वापरण्यात आले आहे. तसेच, या बाइकच्या इंधन टाकीचे डिझाईन आणि फेंडर्स मागील मॉडेल्समधून घेतले आहे.

BSA च्या या बाइकला 652 cc, लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह, ट्विन स्पार्क प्लग इंजिनसह सिंगल-सिलेंडर मोटर मिळणार आहे. हे इंजिन 45 bhp पॉवर आणि 55 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच, 5-स्पीड गियर बॉक्सचे फिचरदेखील देण्यात आले आहे.

ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये सिंगल 320 मिमी फ्लोटिंग डिस्क, ब्रेम्बो ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर, पुढच्या बाजूला एबीएस आणि सिंगल 255 मिमी डिस्क आहे. या बाईकचे वजन सुमारे 213 किलो आहे. बीएसए गोल्ड स्टार 650 ची किंमत रॉयल एनफील्डच्या इंटरसेप्टर 650 इतकीच असू शकते. म्हणजेच, या बाईकची किंमत 3 लाख रुपयांच्या आसपास असेल.