गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर नंतर आता Tesla चे स्टेअरिंग भारतीयाच्या हाती; एलन मस्कनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:28 PM2022-01-04T15:28:00+5:302022-01-04T16:19:36+5:30

Tesla Autopilot Project : एलन मस्क यांनी नुकतीच केली घोषणा.

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), तसंच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या 'ऑटोपायलट' टीमचे प्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या अभियंत्याची नियुक्ती केली आहे. मस्क यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.

विना ड्रायव्हर चाणारी कार म्हणजेच ऑटोपायलट हा मस्क यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मस्क याचं हे स्वप्न पूर्ण करण्यात या भारतीय वंशाच्या अभियंत्याचा मोठा वाटा आहे. 'ऑटोपायलट' टीमचे सर्वात पहिले पहिले कर्मचारी भारतातील अशोक एलुस्वामी होते आणि ते या टीमचे संचालकही आहेत.

मस्क यांनी २०१५ मध्ये ऑटोपायलट टीम तयार करण्यासाठी इंजिनिअर्सची भर्ती करण्यासाठी एक ट्वीट केलं होतं.

ऑटोपायलट प्रोजेक्टसाठी मुलाखत आपण स्वत: घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. तसंच ही टीम थेट त्यांना रिपोर्ट करणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. आता त्यांनी याबाबत एक खुलासा करत या टीममधील पहिली निवड झालेली व्यक्ती ही अशोक एल्लुस्वामी असल्याचं सांगितलं.

टेस्लामध्ये सामील होण्यापूर्वी, अशोक एलुस्वामी फोक्सवॅगन इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅब आणि WABCO व्हिकल कंट्रोल सिस्टमशी संबंधित होते. त्यांनी चेन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवली आहे. त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून रोबोटिक्स सिस्टम्स डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

ऑटोपायलट म्हणजे ड्रायव्हरशिवाय गाडी चालवणे. ऑटोपायलट तंत्रज्ञान अनेक भिन्न इनपुटवर आधारित कार्य करते. मॅपसाठी ते थेट उपग्रहाशी जोडले जाते. कार चालकाला कुठे जायचे आहे, त्याची निवड केली जाते. यानंतर मार्ग निवडला जातो.

कार ऑटोपायलट मोडवर असताना, सॅटेलाइटसह, कारच्या आजूबाजूला देण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमधून इनपुट देखील मिळते. म्हणजेच गाडीच्या पुढे किंवा मागे, उजवीकडे किंवा डावीकडे काहीही नाही याची खात्री केली जाते. जर आजूबाजूला काही असेल तर तेव्हा कार आपोआप उजवीकडे किंवा डावीकडे वळते अथवा थांबते.

कारमध्ये अनेक सेन्सर देखील आहेत, जे सिग्नल रिड करतात आणि कारला रस्त्यावर जाण्यास मदतही करतात. ऑटोपायलट मोडमध्ये कार ११२ किमी प्रतितास वेगापर्यंत पोहोचू शकते. मात्र, या तंत्रज्ञानामध्ये काहीवेळा सेन्सर काम करणे बंद करतात, ज्यामुळे दुर्घटनाही होण्याची शक्यता असते.