परभणी मनपाच्या ११ समित्यांच्या निवडी बिनविरोध; स्थायी समितीसह सात समित्यांवर महिलाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:47 IST2026-04-22T18:46:53+5:302026-04-22T18:47:09+5:30
परभणी मनपा: उद्धव सेनेकडे ६ तर काँग्रेसकडे ४ समित्या; राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मिळाले एक सभापतीपद.

परभणी मनपाच्या ११ समित्यांच्या निवडी बिनविरोध; स्थायी समितीसह सात समित्यांवर महिलाराज
- राजन मंगरुळकर
परभणी : महापालिकेच्या स्थायी समितीसह सात विषय समित्या आणि तीन प्रभाग समितींच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये उद्धवसेनेला सहा तर काँग्रेसला चार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक समिती मिळाली आहे. या ११ समित्यांपैकी आठ समित्यांचे सभापती म्हणून महिलांची वर्णी लागली तर तर तीन सभापतीपद पुरुषांकडे आले आहेत.
मनपाच्या स्थायी समिती सभापती, सात विषय समित्या आणि तीन प्रभाग समिती यांच्या सभापती पदासाठी बुधवारी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया झाली. प्रभारी नगरसचिव यांच्याकडे बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे अर्ज दाखल करण्यात आले. उद्धव सेना, काँग्रेस यांच्याकडून सर्व समित्यांचे सभापतीपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी, उद्धव सेनेचे गटनेते दिलीप ठाकूर, काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान, अतुल सरोदे, व्यंकट डहाळे, सुनील देशमुख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या सर्व समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आता या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बी.रघूनाथ सभागृहात पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये प्रभाग समिती अ, प्रभाग समिती ब चे सभापती आणि समाज कल्याणचे सभापती म्हणून तीन पुरुष राहणार आहे तर उर्वरित सर्व आठ सभापतींचा मान हा महिलांना मिळाला आहे.
या प्रभागांना मिळाले सभापतीपद
प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, सहा, ९, ११, १२, १५ या प्रभागातील नगरसेवकांना सभापती म्हणून विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग ९ मध्ये दोन सदस्यांना सभापतीपद मिळाले तर प्रभाग ११ मध्ये दोन समित्यांसह प्रभाग समितीचे सभापती असे एकूण तीन सभापतीपद मिळाले आहेत. या सर्व सभापतींच्या निवडी एक वर्षासाठी राहणार आहेत.
असे आहेत सभापती
स्थायी समिती : प्रतिभा सरोदे, उद्धवसेना
समाज कल्याण सभापती : राजेश रणखांबे, उद्धवसेना
वैद्यकीय व आरोग्य सहाय्य : अबोली कांबळे, उद्धवसेना
शहर सुधार समिती : शुभांगी पाष्टे, उद्धवसेना
स्थापत्य समिती : सायरा बेगम अलिमोद्दीन, उद्धवसेना
माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती : शमशाद बेगम सय्यद इलाही, काँग्रेस
विधी समिती : रुकसाना बेगम अब्दुल हमीद जहागीरदार, काँग्रेस
महिला व बालकल्याण सभापती : अश्विनी जाधव, काँग्रेस
प्रभाग समिती अ सभापती : रहिस खान सर्फराज खान, उद्धवसेना
प्रभाग समिती ब सभापती : खान मुसद्दीक खान नुरुल्ला खान, काँग्रेस
प्रभाग समिती क सभापती : तबसुम वसीम शेख, राष्ट्रवादी अजित पवार