ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST2020-12-25T04:14:46+5:302020-12-25T04:14:46+5:30

परळी रस्त्यावरील करम पाटी येथे ऑटोरिक्षातून उतरून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या शेख मैमुनाबी शेख मौला (वय ६०, रा. करम ...

Woman killed in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

परळी रस्त्यावरील करम पाटी येथे ऑटोरिक्षातून उतरून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या शेख मैमुनाबी शेख मौला (वय ६०, रा. करम ता. सोनपेठ) यांना गंगाखेड येथून परळीकडे जाणाऱ्या दोन ट्रॉलीचा ट्रॅक्टर हेडच्या (क्र.एम.एच. ४४/ एस. २०८६) चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून धडक दिली. तसेच ऑटोलाही (क्र.एम.एच.२२/ एच ४७३०) जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचालक नवनाथ राठोड हा गंभीर जखमी झाला आहे तर शेख मैमुनाबी शेख मौला यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर भुजंग हुंबे, विष्णू पोते, शेख जुबेर, शेख मंजूर आदींनी जखमी ऑटोचालकाला परळी येथील रुग्णालयात हलविले आहे. सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक देवराव मुंडे, बळीराम करवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे, १३ डिसेंबर रोजीही गंगाखेड -परळी रस्त्यावर या घटनास्थळापासून जवळच असलेल्या निळा शिवारात हायवा टिप्पर व ऑटोरिक्षाचा अपघात होऊन चार युवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या दहा दिवसानंतर याच रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

Web Title: Woman killed in tractor crash