वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:07 IST2025-09-25T13:06:10+5:302025-09-25T13:07:32+5:30
शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीची मुदत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील.

वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
- राजन मंगरुळकर
परभणी : पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू असे आश्वासन पाटील यांनी गुरुवारी केलेल्या पाहणी दरम्यान दिले.
पाहणी दौऱ्यात पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार विजय भांबळे व जिल्ह्यातील अधिकारी त्यांच्यासमवेत होते. यावेळी शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीचे बदललेले निकष आमच्यासाठी नुकसानदायक ठरत असल्याचे सांगून त्यात बदल करण्याची मागणी केली. तसेच वाढीव मदतीची मागणी ही केली.
याप्रसंगी मंत्री मकरंद पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकाचा मुख्य आधार असतो. मात्र, तेच हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्यासाठी येत्या कॅबिनेटसमोर प्रस्ताव मांडला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून वाढीव मदतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी काय करता येते ते करण्याचा प्रयत्न राहील. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीची मुदत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील.
जमीन खरडणीमध्ये मुदतवाढीचा निर्णय घेणार
मंत्री पाटील म्हणाले, जमीन खरडून गेल्याबाबत मिळणारी ४७ हजारांची रक्कम अपुरी असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
साडेआठ हजारात खताची बॅगही येईना
धानोरा काळे येथे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना साडेआठ हजाराची मिळणारी मदत अपुरी असल्याचे सांगून त्यामध्ये कोल्हापूरच्या धरतीवर ३५ हजारापर्यंत वाढ करण्याची मागणी केली. काहीजणांनी घराची पडझड व दुकानात पाणी घुसल्याने झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा प्रश्नही पाटील यांच्यासमोर मांडला. यावर पाटील यांनी या सर्व घरांच्या पडझडीचा पंचनामा प्रशासनाकडून झाल्यानंतर त्यांच्या स्तरावरच मदत देण्यात येत आहे. सध्या झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसात पूर ओसरल्यानंतर केले जातील. जेथे शक्य आहे तेथे पंचनामे सुरू करण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.