धार्मिक कार्यक्रमासाठी गेले, पण नदीत जलसमाधी! परभणीत दोन युवकांचा गोदावरीत बुडून अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:55 IST2025-11-03T15:51:47+5:302025-11-03T15:55:01+5:30
गोदावरी नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले

धार्मिक कार्यक्रमासाठी गेले, पण नदीत जलसमाधी! परभणीत दोन युवकांचा गोदावरीत बुडून अंत
- प्रमोद साळवे
गंगाखेड (परभणी): परभणी जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सोनपेठ तालुक्यातील शिरोरी येथील लुल्ला मासाब दर्गाह येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या परभणी शहरातील दोन युवकांना गोदावरी नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडून मरण पावले. या दुर्दैवी घटनेने परभणी शहरात शोककळा पसरली आहे.
परभणी येथील रौफ खान करीम खान (वय २५) आणि शेख सोफियान शेख जावेद (वय १६) (रा. म.गांधी नगर, धार रोड) हे दोघे युवक रविवारी (दि. २) दुपारी आपले चुलत भाऊजी यांच्या कंदुरी धार्मिक कार्यक्रमासाठी शिरोरी येथील दर्गाहजवळ आले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास दोघेही नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले.
कपडे सापडले, तेव्हा शंका आली
गोदावरी नदीकाठी कलई (नाव) चालवणाऱ्या व्यक्तीला नदीकाठी दोघांचे कपडे आढळले, पण परिसरात कोणीही व्यक्ती दिसली नाही. त्याने कंदुरीच्या ठिकाणी येऊन कपड्यांविषयी विचारणा केली. तेव्हा रौफ आणि सोफियान यांच्या नातेवाईकांना शंका आली आणि त्यांनी तातडीने सोनपेठ पोलिसांना माहिती दिली. सोनपेठचे पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्यासह पोलीस पथक आणि ग्रामस्थांनी तातडीने नदीत शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी ४ वाजता शेख सोफियान (१६) यांचा मृतदेह नातेवाईकांना शोधण्यात यश आले.
दुसऱ्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला
सोफियानचा मृतदेह मिळाल्यानंतर रौफ खानचा शोध रात्रभर सुरू होता. अखेर सोमवारी (दि. ३) दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता रौफ खान (२५) याचा मृतदेह गंगाखेड तालुक्यातील खळी येथील गोदावरी नदीपात्रात नातेवाईकांना आढळला. या दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनपेठ पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.