आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:20 IST2024-12-23T17:18:21+5:302024-12-23T17:20:38+5:30
मानवत तालुक्यातील खरबा येथील घटना

आजोबांसोबत शेतात जाणाऱ्या चिमुकलीस स्कूलबसने चिरडले
- सत्यशील धबडगे
मानवत: खाजगी शाळेच्या स्कूल बसने धडक दिल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8:30 वाजता तालुक्यातील खरबा येथे घडली. शिवाज्ञा दत्ता निर्मळ मृत चिमुकलीचे नाव आहे.
आज सकाळी खरबा येथील मुंजा निर्मळ हे आपली नात शिवाज्ञा दत्ता निर्मळ या चिमुकलीस शेतात घेऊन जात होते. गावातील पाण्याच्या टाकीजवळ आले असता रूढी पाटीकडून करंजीकडे जाणाऱ्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या स्कूल बसने ( एमएच 22 3648) समोरून शिवाज्ञाला जोराची धडक दिली. यावेळी बसचे टायर डोक्यावरून गेल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने बसचालक घटनास्थळावरून निघून गेला.
दरम्यान, जखमी शिवाज्ञाला गावकऱ्याच्या मदतीने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून चिमुकली शिवाज्ञाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी मुंजा निर्मळ यांच्या तक्रारीवरून बसचालक रामेश्वर उर्फ राजेभाऊ पितळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.