खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:40 IST2025-09-29T16:35:02+5:302025-09-29T16:40:00+5:30
नांदेडहून आणलेला मृतदेह पुरातून न्यायची वेळ; चिंचटाकळीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी

खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर
- प्रमोद साळवे
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांवर अतिवृष्टी आणि बॅकवॉटरमुळे मोठे संकट कोसळले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच सोमवारी (दि. २९) चिंचटाकळी येथील नागरिक अच्युत मोरे (वय ४५) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्याचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक ठरला. मृतदेह गावात नेताना खळी नदी पुलावर नातेवाईक आणि कुटुंबीयांना चक्क तराफ्याचा आधार घेऊन पूर ओलांडावा लागला, ज्यामुळे उपस्थित सर्वांना गहिवरून आले.
आई पोहत गेली, आता मृतदेह तराफ्यावर
मागील दोन दिवसांत गंगाखेड तालुक्यात पुरामुळे जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी खळी येथे एक माता आपल्या लेकरांना भेटण्यासाठी याच नदीच्या पुरातून पोहत पलीकडे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच, आज (सोमवारी) मृतदेह गावात नेण्यासाठी याच पुराचा सामना करावा लागला. मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईक व कुटुंबीयांना खळी नदीवरील पुलावर पाणी असल्याने नाइलाजाने तराफ्याचा आधार घ्यावा लागला. गावातील खळीकरांनी तातडीने मदत करत या भावनिक प्रसंगात मोरे कुटुंबाला मोठा आधार दिला.
पुलाची उंची वाढवण्याचा मुद्दा ऐरणीवर
खळी येथील नदीच्या पुलाची उंची वाढवावी, अशी खळीकरांसह गौडगाव, चिंचटाकळी, पुनर्वसित खळी या गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, हा प्रस्ताव शासन-प्रशासन दरबारी लालफीतीत अडकून पडला आहे. परिणामी, रविवार आणि सोमवारसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांना गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून सामोरे जावे लागत आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे पिके आणि नागरिकांना फटका बसला असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मृतदेह गावात नेणेही अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. या हृदयद्रावक प्रसंगाने प्रशासकीय दुर्लक्ष आणि निसर्गाची क्रूरता पुन्हा एकदा उघड झाली आहे.