परभणी जिल्ह्यात आभाळ फाटले; घरांत पाणी, शेतात पूर, रस्ते बंद, पेठशिवणीत ११२ मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:25 IST2025-10-07T17:20:36+5:302025-10-07T17:25:01+5:30
शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले वाहून

परभणी जिल्ह्यात आभाळ फाटले; घरांत पाणी, शेतात पूर, रस्ते बंद, पेठशिवणीत ११२ मिमी पाऊस
परभणी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन आणि कापसाचे पीक पाण्यात वाहून गेले. महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस झाला असून, पालम तालुक्यातील पेठशिवणी मंडळात तब्बल ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी काढणीस आलेल्या सोयाबीनसाठी शेतात उतरले होते. काही शेतकरी पाण्याचा निचरा करून उरलेले कापूस पीक वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सोमवारी पहाटे पुन्हा आभाळ कोसळल्याने शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया गेली. पेडगाव, किन्होळा, आव्हाडवाडी, आर्वी आदी गावांमध्ये घरांत पाणी शिरले. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने कापूस व सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेला. किन्होळा गावात स्मशानभूमीलाही पाण्याने तळ्याचे स्वरूप आले, तर आर्वी गावात ग्रामपंचायत व मंदिर परिसरात पाणी साचले. पेडगाव महसूल मंडळातील सर्व गावांत शेतशिवार पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक हिरावून नेले.
पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाजवळील सोनारी नदीला पूर आल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. या मंडळात ६८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात जोरदार पावसामुळे शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले. शेतातील पिके मातीमोल झाली असून, ३० केव्ही उपकेंद्रालाही पाण्याचा वेढा पडला होता. तसेच देऊळगाव अवचार-भोगाव साबळे गावाला जोडणारा पूल वाहून गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सावरगाव, देऊळगाव अवचार, सोमठाणा, आटोळा, आंबेगाव या गावांतही तीन तास मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले असून, पिकांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
परभणी शहरात रस्ते जलमय; २५ जणांचे स्थलांतर
सोमवारी पहाटे ग्रामीण भागाबरोबर परभणी शहरातही मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. वाढते पाणी पाहून प्रशासनाला या भागातील काही नागरिकांचे रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. त्याचबरोबर या परिसरातील २५ जणांचे स्थलांतर अक्षदा मंगल कार्यालयात सोमवारी करण्यात आले.