लाचखोरांचे धाडस; महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी स्वीकारली लाचेची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:17 IST2025-08-21T12:15:52+5:302025-08-21T12:17:49+5:30
राहत्या घरी तक्रारदाराकडून ८ हजारांची रक्कम घेताच महिला ग्रामविकास अधिकाऱ्यास एसीबीने पकडले

लाचखोरांचे धाडस; महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी स्वीकारली लाचेची रक्कम
परभणी : तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या फाईलसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने केली होती. तक्रारीच्या पडताळणीनंतर बुधवारी एसीबीच्या सापळा कारवाईत महिला ग्रामविकास अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती आठ हजारांची लाचेची रक्कम राहत्या घरी स्वीकारली.
आम्रपाली लक्ष्मणराव काकडे (३८, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.प. कार्यालय, किन्होळा, पं.स.परभणी) असे आरोपी लोकसेविकेचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले. घरकुलाचा पहिला हप्ता प्रत्येकी १५ हजारप्रमाणे ३० हजार २१ जुलैला त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला. तक्रारदारांनी घरकुलाचे काम सुरू करण्याचे अनुषंगाने आवश्यक कागदपत्राची फाईल घेऊन लोकसेविका काकडे यांना १४ ऑगस्टला दुसऱ्या हप्त्याविषयी भेटीदरम्यान विचारणा केली. त्यावेळी लोकसेविका काकडे यांनी तक्रारदार यांना संपूर्ण फाईल तयार करून एका फाईलचे पाच हजार असे दोन्ही मिळून दहा हजार रुपये लागतात, असे सांगून लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदारांनी एसीबी परभणीकडे तक्रार केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने १८ ऑगस्टला आरोपी लोकसेविकेने तक्रारदारास घरी बोलावल्याने पंचासह पडताळणी केली. यामध्ये दोन फाईलसाठी आठ हजारांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष तडजोडीअंती केली. त्यानुसार बुधवारी एसीबीने सापळा कारवाई केली. यामध्ये लोकसेविका आम्रपाली काकडे यांनी त्यांच्या राहत्या घरी कारेगाव रोड येथे पंचासमक्ष आठ हजारांची लाच रक्कम स्वीकारली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीची अंगझडती आणि घरझडती प्रक्रिया सुरू असून नवा मोंढा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनीषा पवार, अल्ताफ मुलानी, पोलिस कर्मचारी रवींद्र भूमकर, सीमा चाटे, कल्याण नागरगोजे, राम घुले, शेख जिब्राहिल, नरवाडे, लहाडे यांनी केली.