जीवाशी खेळ! चाकाच्या निखळलेल्या नटबोल्टच्या जागी लाकडी खुटी लावून एसटीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:52 IST2026-01-13T11:52:20+5:302026-01-13T11:52:48+5:30
जिंतूर एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

जीवाशी खेळ! चाकाच्या निखळलेल्या नटबोल्टच्या जागी लाकडी खुटी लावून एसटीचा प्रवास
वझर (जि. परभणी) : जिंतूर आगाराने प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू केल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी जिंतूर तालुक्यातील वझर गावाजवळ घडला. एसटीच्या चाकाच्या निखळलेल्या नटबोल्टच्या जागी लाकडी काड्या लावून प्रवास करण्याचा प्रताप चालक-वाहकांनी केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. जिंतूर आगाराची बस क्रमांक (एमएच २० बीएल २३१४) वझर-जिंतूर रस्त्यावरून धावत होती. दरम्यान, या एसटीच्या मागील चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे आठपैकी सहा नटबोल्ट निखळले तर उर्वरित दोन नटबोल्टही ढिले होते. या दोन्ही नटबोल्टलाही दोरी बांधली तर उर्वरित नटबोल्टच्या जागी चक्क लाकडी खुट्ट्या ठोकून बस चालवण्यात आली. सुदैवाने कोणताही अपघात झाला नसला तरी या रामभरोसे कारभाराला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.
कालबाह्य, नादुरूस्त बस रस्त्यावर
आधीच खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असताना दुसरीकडे नादुरूस्त, कालबाह्य बसेस रस्त्यावर धावत आहेत. अशा स्थितीत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाकडून बस सुस्थितीत असल्याशिवाय मार्गस्थ केली जात नसल्याचे सांगितले जाते. मग अशा बस रस्त्यावर कशा धावत आहेत? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.