खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:54 IST2022-12-08T11:54:35+5:302022-12-08T11:54:51+5:30
युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

खळबळजनक! सेलूत भररस्त्यात पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
देवगावफाटा (परभणी): सेलू येथे रेल्वेस्टेशन परिसरातील रस्त्यावर बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका युवकास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विश्वनाथ पवार असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ बापुराव पवार उर्फ झोटींग्या (३२, रा.फुले नगर, सेलू) हा बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्टेशन परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर उभा होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने येऊन विश्वनाथवर पेट्रोल फेकत काही कळायच्या आत आग लावली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आग विझवत विश्वनाथला तातडीने ऑटोरिक्षामधून सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास लागलीच परभणी येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. विश्वनाथ ४५ टक्के भाजल्याची माहिती असून त्याची प्रकृती गंभीर आहे. वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
हल्लेखोर अज्ञात, कारण अस्पष्ट
हा हल्ला नेमका कोणी केला ? यामागील कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, वर्दळीच्या रस्त्यावर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या या प्रकाराने शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलीस प्रशासन आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.