'मसल्या'त महसूलची आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई; ३ छावण्या नष्ट, ३५ ब्रास वाळू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:18 IST2024-12-20T11:17:54+5:302024-12-20T11:18:41+5:30
गंगाखेड - तालुक्यातील मसला येथे गुरुवारी उशिरा तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने वाळू माफियांविरोधात कारवाई केली.

'मसल्या'त महसूलची आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई; ३ छावण्या नष्ट, ३५ ब्रास वाळू जप्त
- प्रमोद साळवे
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मसला येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियायांच्या ३ छावण्या व एक तरफा गुरुवारी (दि.१९) जाळून नष्ट करण्यात आला. दरम्यान तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी मसला येथे आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. गुरुवारी रात्री उशिरा जप तक गेलेली वाळू तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तालुक्यातील मसला गोदाकाठ हा वाळू माफीयांचा अवैध वाळू चोरीचा अड्डा बनल्याचे चित्र दिवसेंदिवस पुढे येत आहे. गुरुवारी (दि.१९) रोजी तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने तालुक्यातील मसला गोदाकाठ शिवारातून वाळू माफीयांच्या ३ छावण्या व १ तरफा नष्ट केला. या कारवाईस २५ ब्रास वाळूसह फावडे, टोपले आदी साहित्य जमा करण्यात आले.
तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार अशोक केंद्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, महसूल सहाय्यक गणेश सोडगीर, तलाठी संतोष इप्पर, शिपाई अर्जुन आघाव, पोलीस पाटील शिंदे, सरपंच शिंदे आदींच्या पथकाने गुरुवारी दिवसभरात ही कारवाई केली. गुरुवारी रात्री उशिरा नदीकाठावर जप्त करण्यात आलेली वाळू तहसील कार्यालयात आणून जमा करण्याची कारवाई सुरू होती.