राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:28 IST2025-08-05T18:22:32+5:302025-08-05T18:28:34+5:30
परभणीत काँग्रेसला नवे बळ; बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय

राजकीय पुनर्जन्म की नव्या संघर्षाची नांदी; शरद पवारांचे विश्वासू बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर
परभणी : शरद पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केलं आहे. ७ ऑगस्ट रोजी मुंबईत टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, दुर्राणी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश हा त्यांच्यासाठी राजकीय पुनर्जन्म ठरतो की नव्या संघर्षाची नांदी ठरेल, अशी चर्चा परभणीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बराच काळ शरद पवार यांच्याशी एकनिष्ठता जपली. मात्र, काही काळानंतर त्यांनी अजीत पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्या गटाचे जिल्हाध्यक्षही बनले. पुढे छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या गटात परत प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा अजीत पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या प्रवेशात अडथळे निर्माण झाले आणि तो रखडला. यामुळे दोन्ही गटांपासून मनाने दुरावलेले, अस्वस्थ झालेल्या बाबाजानी दुर्राणी यांनी आता अखेर काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो.
१९८० च्या दशकापासून दुर्राणी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते विधानपरिषदेवरील दोन टर्म्स, परभणीतील संघटन, जिल्हाध्यक्षपद, वक्फ बोर्ड सदस्यत्व अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे निभावल्या. त्यांचं पाथरी नगरपालिकेवर दशकानुदशक वर्चस्व राहिलं आहे. पण, अलीकडील काही वर्षांत राष्ट्रवादीत आलेली फूट, उमेदवारीच्या वाटपातील गोंधळ, आणि स्थानिक पातळीवरील पक्षातील दुर्लक्ष यामुळे दुर्राणी कमालीचे अस्वस्थ झाले होते. विशेषतः पाथरी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांना अपक्ष लढावं लागलं आणि त्यात पराभव पत्करावा लागला. यामुळे दुर्राणी समर्थकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यानंतर पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची देखील त्यांची इच्छा होती. मात्र, पुढे काही घडले नाही.
वरपूडकर गेले, दुर्राणी आले!
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस जिल्ह्यात बिथरलेली दिसत होती. मात्र आता, दुर्राणींच्या प्रवेशामुळे परभणीत काँग्रेस नव्या उमेदीने उभारी घेणार, अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. दुर्राणी यांना केवळ मुस्लिम समाजाचा पाठिंबा नाही, तर मराठा व ओबीसी मतदारांमध्येही त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक शक्तीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळेच परभणी काँग्रेससाठी दुर्राणींचा प्रवेश म्हणजे ‘ऑक्सिजन’ ठरू शकतो.
राजकीय पुनर्जन्म, की नव्या संघर्षाची सुरुवात?
बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंतच्या प्रवासात ते अनेकदा भूमिकेत बदल करत राहिले. आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी एक नवीन सुरुवात केली आहे. पण हाच प्रवास त्यांच्यासाठी पुन्हा वैचारिक लढ्याचा आणि संघटनेसाठीच्या संघर्षाचा नवा अध्याय ठरणार आहे.
दुर्राणींची भूमिका स्पष्ट
“राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे हे भाजपने घडवले. अल्पसंख्यांक समाजाला या फोडाफोडीमधून न्याय मिळत नाही. उलट, काँग्रेसच एकमेव पक्ष आहे जो सर्व धर्म-जातींना सोबत घेऊन चालतो,” असं सांगत दुर्राणींनी काँग्रेसप्रवेशाचं ठोस कारण दिलं. त्यांनी अजित पवार गटावरही घणाघाती टीका केली, “राष्ट्रवादीचे आमदार मुस्लिमविरोधी वक्तव्य करतात, पण पक्ष त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही. ही स्थिती अल्पसंख्यांक समाजाच्या अस्वस्थतेचं कारण आहे,” असं दुर्राणी म्हणाले.
“नेते जातात, पण कार्यकर्ते अजूनही काँग्रेस विचारात निष्ठावान”
दुर्राणी म्हणाले, “सत्तेच्या हव्यासापोटी नेते पक्ष सोडत असले, तरी विचारांशी प्रामाणिक कार्यकर्ते अजूनही काँग्रेसबरोबर आहेत. आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा प्रत्येक गावात फडकवणार.”