निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांचा दणका; सराईत सहा गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:41 IST2025-11-21T19:40:01+5:302025-11-21T19:41:24+5:30
याबाबत पोलीस निरीक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांचा दणका; सराईत सहा गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार
परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड आणि पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या सराईत सहा गुन्हेगारांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याबाबत पोलीस निरीक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे तसेच दुखापत पोहोचविणे, विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या इसमांविरुद्ध हे प्रस्ताव पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पाठविले. यामध्ये गंगाखेड हद्दीतील राजू दत्ता दराडे (रा.कृष्ण नगर, गंगाखेड), बालासाहेब दत्तराव लांडे (रा.वझुर, ता.पूर्णा), शिवाजी सर्जेराव गाडेकर (रा.अकोली, ता. गंगाखेड) गोविंद दिलीप आंधळे (रा.झोला, ता.गंगाखेड) सचिन रमेशराव जोगदंड (रा. देवठाणा, ता.पूर्णा) आणि पूर्णा हद्दीतील प्रताप अच्युतराव कदम (रा.कदम गल्ली, पूर्णा) या सहा जणाविरुद्ध पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
उपविभागीय दंडाधिकारी यांनी अंतिम चौकशी करून संबंधित सर्वांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्याच्या सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणाऱ्या सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या अवैध धंदे तसेच प्रशासनास वेठीस धरणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन केले जाणार आहे. अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.