पाथरी पंचायत समितीवर आमदार राजेश विटेकरांचा 'पॉवर गेम'! काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:49 IST2026-03-11T12:48:56+5:302026-03-11T12:49:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागा जिंकल्या; बाबाजानी दुर्राणींचा पाठिंबा अन् राजेश विटेकरांचा डाव यशस्वी

पाथरी पंचायत समितीवर आमदार राजेश विटेकरांचा 'पॉवर गेम'! काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता
पाथरी (जि. परभणी): पाथरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये स्पष्ट बहुमत नसतानाही आमदार राजेश विटेकर यांनी टाकलेला राजकीय डाव अखेर यशस्वी झाला आहे. काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या सहकार्याने आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या बिनशर्त पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर विजय मिळवत सत्ता आपल्याकडे राखली आहे.
असे जुळले विजयाचे गणित
१० सदस्य असलेल्या पाथरी पंचायत समितीत राष्ट्रवादीकडे ४, उद्धवसेनेकडे ३, काँग्रेसकडे २ आणि शिंदेसेचे १ असे संख्याबळ होते. उद्धवसेनेने शिंदेसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीला रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमदार विटेकरांनी काँग्रेसच्या दोन सदस्यांना सोबत घेत सहा मतांचा कोटा पूर्ण केला. मतदानात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ६ तर उद्धवसेनेच्या उमेदवारांना ४ मते पडली.
सुनीता डुकरे सभापती, तर सचिन अंबुरे उपसभापती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती सुनीता गजेंद्र डुकरे यांनी उद्धवसेनेच्या मनीषा कोल्हे यांचा पराभव करत सभापती पद पटकावले. तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे सचिन लिंबाजी अंबुरे यांनी उद्धवसेनेच्या ज्ञानेश्वर शिंदे यांचा पराभव केला. या विजयामुळे पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी या चारही पंचायत समितीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व निर्माण झाले आहे. या निकालाने जिल्ह्यात आमदार राजेश विटेकर यांचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.