परभणी: महिलाच चालविणार ५ मतदान केंद्रांचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:02 IST2019-03-29T00:02:28+5:302019-03-29T00:02:39+5:30
परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़

परभणी: महिलाच चालविणार ५ मतदान केंद्रांचा कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़
भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेला महत्त्व असून, ही निवडणूक प्रक्रिया किचकट असते़ सर्वसाधारणपणे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते़ शक्यतो महिला कर्मचाऱ्यांना बैठी कामे आतापर्यंत दिली जात होती़ मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, महिलांनीही स्वत:हून या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे, या उद्देशााने प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत़ निवडणूक विभागाच्या या निर्देशानुसारच परभणी विधानसभा मतदार संघातही पाच महिला मतदान केंद्र निर्माण करण्याची तयारी सुरू झाली आहे़
शहरातील वसमत रोडवरील कृषी सारथीनगर भागातील गांधी विद्यालय, एकतानगर भागातील गांधी विद्यालय, सारंग स्वामी शाळा, मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्यालय आणि जुना पेडगाव रोड भागातील भारतीय बाल विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्र हे महिला मतदान केंद्र म्हणून चालविण्याचे नियोजन केले जात आहे़ लवकरच या संदर्भात अधिकृत निर्णय होणार आहे़ या महिला मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २, ३, सुरक्षा रक्षक आणि सेवक या सर्व पदांची जबाबदारी महिला अधिकारी, कर्मचाºयांना दिली जाणार आहे़ त्यामुळे या केंद्रांचा कारभार महिलांच्या माध्यमातून होणार असून, याच माध्यमातून केंद्रावरील महिलांचे मतदान वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे़