परभणी : बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:25 IST2019-06-26T00:25:00+5:302019-06-26T00:25:17+5:30
पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या एप्रिल महिन्यात झालेल्या घटनेतील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना गजाआड केले आहे़

परभणी : बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या एप्रिल महिन्यात झालेल्या घटनेतील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना गजाआड केले आहे़
पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ९ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या संरक्षण भिंतीवरून चॅनल गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला होता़ आत जात असताना आरोपींनी नजरेस पडेल ते इलेक्ट्रीकल वायर कटरच्या सहाय्याने तोडले़ हे वायर तोडत असताना बँकेतील तिजोरीजवळ आरोपी आले व त्यांनी रॉडच्या मदतीने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला़ तर अन्य एक जण तिजोरी रुममधील इलेक्ट्रीक वायर तोडत असताना सेक्युरिटी आलार्म वाजला़ त्यानंतर आरोपी पळून गेले़ याबाबत व्यवस्थापक अजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात १० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रवीणे मोरे यांच्या अधिपत्याखालील स्थागुशाच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली़ त्यात त्यांना फारशी माहिती हाती आली नाही़ त्यानंतर गोपनीय माहिती काढून त्यांनी यातील आरोपींचा शोध घेतला़ त्यानंतर २५ जून रोजी शेख अखिल शेख आजीम (२२, रा़ रहेमान नगर, पाथरी), शेख खुदबोद्दीन शेख शहादुल्ला (रा़ दर्गा मोहल्ला, पाथरी) या दोघांना पाथरी येथून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत कौशल्याने विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारासोबत मिळून सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली़ त्यानुसार पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत़ ही कारवाई सपोनि शिवाजी देवकते, पोहेकॉ सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, पोलीस नाईक जमीर फारुखी, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, गणेश कौटकर, राजेश आगासे यांच्या पथकाने केली़ दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़