'११२' वर मारहाणीचा फेककॉल अन् मोबाईल बंद; मस्करी करणाऱ्यास पोलिसांनी शिकवला धडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:43 IST2026-03-21T18:42:57+5:302026-03-21T18:43:39+5:30
पोलिसांची मस्करी नडली! मारहाणीचा खोटा फोन करणाऱ्यावर जिंतूरमध्ये कारवाई, तरुण अटकेत

'११२' वर मारहाणीचा फेककॉल अन् मोबाईल बंद; मस्करी करणाऱ्यास पोलिसांनी शिकवला धडा!
- राजन मंगरुळकर
परभणी : मला मारहाण झाल्याची माहिती एकाने पोलिसांच्या डायल ११२ या यंत्रणेला फोनद्वारे दिली. पोलिसांनी त्वरित मदतीसाठी इसमाचा शोध घेतला असता, त्याने मोबाइल बंद करून ठेवला. यानंतर संबंधिताची ठाण्यात बोलावून विचारपूस केली असता, त्याने अशी काही घटना घडलीच नव्हती. तसेच उडवाउडवीची उत्तरे देऊन डायल ११२ यंत्रणेवर फोन करून खोटी माहिती दिल्याचे सांगितले. हा प्रकार जिंतूर येथे घडला. याप्रकरणी जिंतूर ठाण्यात खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा नोंदविला.
पोलिस शिपाई महादेव गव्हाण हे जिंतूर ठाण्यात डायल ११२ यंत्रणेवर कार्यरत असताना शिवाजी मुक्ताची मार्कड (३५, रा. मोहाडी, ता. जिंतूर) याने मोबाइलवरून डायल ११२ वर मारहाण झाल्याची माहिती दिली. यानंतर स्वतःचा मोबाइल बंद करून ठेवला. सदरील फोन करणाऱ्याचा शोध घेऊन पोलिस ठाण्यात त्यास बोलावून घेण्यात आले. घटनेची माहिती विचारली असता, अशी घटना घडली नसल्याचे सांगून त्याने हा फोन करून खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट केले. त्यावरून जिंतूर ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, गुंगाने, राठोड, गजभार, गव्हाणे यांनी केली.
तर कायदेशीर कारवाई
डायल ११२ ही यंत्रणा गरजुंना अडचणीच्या वेळी त्वरित मदती मिळावी यासाठी कार्यान्वित आहे. कोणीही पोलिसांना त्रास होईल यादृष्टीने डायल ११२ वर फोन लावून खोटी माहिती दिली तर त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले.