परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:13 IST2018-12-22T00:12:23+5:302018-12-22T00:13:23+5:30
शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.
शहर पाणीपुरवठा योजने संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, आयुक्त रमेश पवार, सभागृह नेते भगवान वाघमारे, शहर अभियंता वसीम पठाण आदींची उपस्थिती होती. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येलदरी ते धर्मापुरी अशी ५५ कि.मी.ची जलवाहिनी टाकली आहे. यासाठी १ कोटी २५ लाख लिटर क्षमतेचे स्टोरेज बांधण्यात आले आहे. धर्मापुरी परिसरात दोन जलशुद्धीकरण केंद्रातून खाजा कॉलनी येथील जलकुंभात पाणी आणले जाणार आहे. या ठिकाणाहून नवीन जलवाहिनी उड्डाणपूल मार्गे शिवाजी महाराज यांचा पुतळा ते राहाटी बंधाऱ्यापर्यंत १५ कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार असून दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीत ही माहिती दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती रमेश पवार यांनी दिली. सध्या राहाटी बंधाºयात सिद्धेश्वर धरणातून पाणी घेतले जाते. एका पाणीपाळीसाठी ४ ते ५ घनमीटर पाणी लागते. नवीन प्रस्तावित जलवाहिनी टाकली तर पाण्याचा अपव्यय टळणार असल्याचेही आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.