Parbhani: Laborers work for laborers; No migration | परभणी : मजुरांना मुबलक कामे; स्थलांतर नाहीच
परभणी : मजुरांना मुबलक कामे; स्थलांतर नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंभीर दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याचा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’, ‘लोकमत’ ने प्रसिद्ध करुनही या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुबलक कामे उपलब्ध आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर होण्याचा प्रश्नच नाही, असे लेखी सरकारी ठेवणीतील उत्तर सोमवारी सभागृहात दिले.
परभणी जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली. उन्हाळ्यात जवळपास दीडशे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला गेला. दुष्काळामुळे हाताला कामच नसल्यामुळे ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर झाले. या संदर्भात प्रातिनिधीक स्वरुपात १४ मे रोजीच्या अंकात ‘लोकमत’ने गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी या गावाचा ‘आॅन दी स्पॉट रिपोटर्’ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये या गावातील अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी रोजगारासाठी स्थलांतर केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. या संदर्भात सदरील गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. तसेच २०० कुटुंब संख्येच्या या गावात ८०० मजुरांची रोहयो संदर्भात नोंदणी आहे; परंतु, कामचे उपलब्ध नसल्याने येथील मजुरांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहराकडे स्थलांतर केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते.
विशेष म्हणजे, रोहयो विभागाने मात्र त्यावेळी जिल्ह्यात २९ हजार मजूर कामावर असल्याचे सांगून ७२४ कामे जिल्ह्यात सुरु असल्याचे नमूद केले होते. कागदी घोडे नाचविणाºया प्रशासकीय यंत्रणेचा पंचनामा ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ च्या माध्यमातून ‘लोकमत’ने केला होता. या पार्श्वभूमीवर आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे व इतर आमदरांनी या संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या बेरोजगारांची संख्या वाढली असून शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे का? असल्यास राज्यातील अर्धकुशल व बेरोजगार मजुरांना काम मिळत नसल्याने इतर राज्यात कामासाठी त्यांचे स्थलांतर होत आहे, हे खरे आहे का? असल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्राशी निगडित असलेल्या मजुरांना व अर्धकुशल मजुरांना राज्यात पुरेस्या प्रमाणात काम मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असे प्रश्न केले होते. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे म्हणणे खरे नाही. शिवाय कामासाठी त्यांचे स्थलांतर होत नाही, असे सांगून महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेंतर्गत राज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात पुरेस्या प्रमाणात कामाचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे मजूर स्थलांतरित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मजुरांना पुरेस्या प्रमाणात कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग, रेशीम उद्योगअंतर्गत अनेक वैयक्तिक शेतकºयांच्या शेतावर तसेच सामूहिक स्वरुपाची कामे अकुशल मजुरांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे या उत्तरात क्षीरसागर यांनी म्हटले आहे. क्षीरसागर यांनी हे शासकीय पठडीतील लेखी उत्तर दिले असून प्रत्यक्ष फिल्डवर काय स्थिती होती, याची माहिती घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली नाही, असा रोहयोमंत्र्यांचा दावा फोल ठरत आहे.
जिंतूर, गंगाखेडमध्ये : अधिक स्थलांतर
४दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्यामुळे जिंतूर व गंगाखेड तालुक्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याची बाब उन्हाळ्यात निदर्शनास आली होती. हे मजूर कामासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी स्थलांतरित झाले.
४ विशेष म्हणजे दुष्काळामुळे शेतीत काम नसल्याने त्यांना शासनाने विशेष अनुदानाच्या धर्तीवर विशेष भत्ता देणे आवश्यक होते; परंतु, मजुरांचे संघटन नसल्याने त्यांना दुष्काळग्रस्तांच्या कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. परिणामी दुष्काळाने होरपळणाºया जनतेला दिलासा देण्याचा शासनाकडून केला जाणारा दावा फोल ठरत आहे.


Web Title: Parbhani: Laborers work for laborers; No migration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.