शेतकऱ्याची अडवणूक महागात! जमिनीच्या मोजणीसाठी लाच घेणारा लिपिक 'एसीबी'च्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:07 IST2026-04-08T20:06:00+5:302026-04-08T20:07:01+5:30
पाथरी भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा ट्रॅप; जमिनीच्या सर्व्हेसाठी लाच घेताना वरिष्ठ लिपिक अटकेत.

शेतकऱ्याची अडवणूक महागात! जमिनीच्या मोजणीसाठी लाच घेणारा लिपिक 'एसीबी'च्या ताब्यात
पाथरी (जि. परभणी): उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, पाथरी येथील वरिष्ठ लिपिक (निमतानदार) रामेश्वर गुरुलिंगप्पा बिडकर (४५) यास बुधवारी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या पुतण्याची शेतजमीन ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमध्ये गेली असून, त्याच्या पुनर्मोजणीचा सर्व्हे करण्यासाठी बिडकरने लाचेची मागणी केली होती. परभणी 'एसीबी'च्या पथकाने पाथरी येथील साई मंदिर रोडवरील एका दुकानासमोर हा यशस्वी सापळा रचला.
पुनर्मोजणीसाठी १२ हजारांची मागणी
तक्रारदाराच्या पुतण्याची वडी (ता. पाथरी) येथील गट क्रमांक २४ मधील जमीन बंधाऱ्याच्या पाण्याखाली गेली आहे. यापूर्वी झालेल्या मोजणीत जमीन कमी भरल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुनर्मोजणीचे आदेश दिले होते. या सर्व्हे प्रक्रियेसाठी निमतानदार बिडकर याने सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले, ज्यापैकी ८ हजार रुपयांचा पहिला हप्ता बुधवारी सकाळी स्वीकारताना बिडकरला पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतले.
एसीबीकडून गुन्हा दाखल आणि घराची झडती
तक्रारदाराने मंगळवारी दिलेल्या तक्रारीनंतर 'एसीबी'ने या प्रकरणाची गुपचूप पडताळणी केली होती. बुधवारी सकाळी ९:३० वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी लोकसेवक बिडकरचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.