परभणीत होमगार्ड कार्यालयात पदोन्नतीसाठी २५ हजारांची लाच; 'एसीबी'ने तिघांना घेतले ताब्यात
By मारोती जुंबडे | Updated: February 23, 2026 18:53 IST2026-02-23T18:53:17+5:302026-02-23T18:53:56+5:30
पदोन्नती मिळाली पण 'लक्ष्मी' दर्शन न झाल्याने अडवणूक! परभणीत होमगार्ड कार्यालयातील ३ अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

परभणीत होमगार्ड कार्यालयात पदोन्नतीसाठी २५ हजारांची लाच; 'एसीबी'ने तिघांना घेतले ताब्यात
परभणी : जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील पदोन्नती प्रकरणात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी यशस्वी सापळा कारवाई करत तिघा अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी एका अधिकाऱ्याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
लाप्रवि विभागाकडे ३७ वर्षीय तक्रारदाराने २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदारास ३१ डिसेंबर २०२५ रोजी पलटण नायक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. या पदोन्नतीच्या बदल्यात केंद्रनायक नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा बाबुराव लटपटे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद होते. त्यापैकी ८ हजार रुपये यापूर्वी ऑनलाइन व्यवहाराद्वारे स्वीकारल्याचा आरोप आहे. तक्रारीची पडताळणी २० फेब्रुवारी रोजी जिंतूर रोडवरील एका हॉटेलमध्ये करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीची २५ हजारांची मागणी मान्य करून उर्वरित रकमेबाबत तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर २३ फेब्रुवारी रोजी जिंतूर रोड परिसरात सापळा रचण्यात आला. वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. अन्य दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अंगझडतीदरम्यान आरोपींकडून मोबाईल हँडसेट व काही रोख रक्कम जप्त करण्यात आली असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाप्रवि परभणीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे करत आहेत.