परभणी : १० कोटींचा निधी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:08 IST2019-01-08T00:07:37+5:302019-01-08T00:08:33+5:30
जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक उंचवावा, यासाठी राज्य शासनाने १० कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९ कोटी ९५ लाख रुपये विविध शासकीय यंत्रणांना विकासकामांसाठी वितरित करण्यात आले आहेत.

परभणी : १० कोटींचा निधी वितरित
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक उंचवावा, यासाठी राज्य शासनाने १० कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९ कोटी ९५ लाख रुपये विविध शासकीय यंत्रणांना विकासकामांसाठी वितरित करण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी असल्याने हा निर्देशांक उंचविण्यासाठी जिल्ह्यात मानव विकास मिशन अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. शासकीय कार्यालयांमार्फत या योजना राबवून जिल्ह्यातील नागरिकांचा शैक्षणिक, आरोग्य विषयक आणि रोजगाराच्या संदर्भात विकास करण्याचा उद्देश ठेवून हा निधी शासकीय यंत्रणांना दिला जातो.
दरवर्षी या योजनेंतर्गत निधीचे वितरण होत असले तरी प्रत्यक्षात वेळेवर योजना राबविल्या जात नसल्याने खर्चही ठराविक वेळेत होत नाही. परिणामी ज्या उद्देशाने निधी दिला जातो, त्या उद्देशालाही बगल दिली जात आहे.
विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून या विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण केले जाते. त्यासाठी घरापासून दूर अंतरावर शाळा असणाऱ्या विद्यार्थिनींची यादी पाठविण्यास विलंब लावला. अर्धे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मानवविकास विभागाला २ हजार ४७१ मुलींची यादी प्राप्त झाल्याने या मुलींसाठी डिसेंबर महिन्यामध्ये ८६ लाख ४९ हजार रुपये शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींच्या उदरनिर्वाहासाठी ५२ लाख ५० हजार रुपये आणि याच विद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासाठी ४१ लाख ९२ हजार रुपये मानव विकासने वितरित केले आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी मानव विकास विभागाकडून बसेसची व्यवस्था केली जाते.
जिल्ह्यात मानव विकासच्या ६३ बस सुरु असून या बसगाड्यांच्या खर्चापोटी ४ कोटी ४३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी एस.टी.महामंडळाला वितरित करण्यात आला आहे.
मानव विकासच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतानाही हा निधी खर्च करताना अर्धे आर्थिक वर्ष संपले असतानाही खर्चाचा आकडामात्र कमी असल्याने निधी उपलब्ध होऊनही लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ वेळेत पोहोचत नसल्याचेच दिसत आहे.
केवळ चार लाभार्थ्यांना बुडित मजुरी
ग्रामीण भागातील मजूर महिलांना प्रसुतीच्या काळात अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मानव विकास मिशन अंतर्गत महिलांसाठी ४ हजार रुपये बुडित मजुरी दिली जाते. प्रसुतीच्या काळात सातव्या महिन्यात २ हजार रुपये आणि नवव्या महिन्यात २ हजार रुपये अशा दोन टप्प्यात लाभार्थ्याच्या खात्यावर ही बुडित मजुरी जमा केली जाते. मानव विकास मिशनने ७ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाला १६ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित केला. मात्र सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत केवळ ४ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला असून १६ हजार रुपयांचाच खर्च झाला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५ हजार १२२ लाभार्थ्यांसाठी मानव विकास मिशनने २ कोटी ४ लाख रुपयांचा निधी वितरित केला होता. ग्रामीण भागात २ हजार ४३४ लाभार्थ्यांना ९७ लाख ३६ हजार रुपयांची बुडित मजुरी वितरित करण्यात आली आहे.
आरोग्य शिबिरांवर
८८ लाखांचा खर्च
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महिन्यातून दोन वेळेस आरोग्य शिबिरे घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. ही शिबिरे घेण्यासाठी मानव विकास मिशनमधून निधीही दिला जातो. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना या योजनेंतर्गत १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून आतापर्यंत ८८ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.